सांगली : ‘संग्राम’ म्हणजेच संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र या योजनेतून जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायती, दहा पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेला पुरवठा केलेल्या युपीएस बॅटऱ्या कमी क्षमतेच्या पुरवठा करून शासनाची फसवणूक केली आहे. म्हणूनच पुरवठादार ‘ए-झेड’ इलेक्ट्रॉनिक्स कंपनीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी दिली. तसेच भविष्यात या कंपनीस काळ्या यादीतही टाकण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, संबंधित पुरवठादार कंपनीने कमी क्षमतेच्या युपीएस बॅटऱ्या देऊन शासनाची सुमारे ६० ते ७० लाखांची फसवणूक केल्याचा ठपका अधिकाऱ्यांनी कंपनीवर ठेवला आहे.आज, शुक्रवारी अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाली. या सभेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते सुरेश मोहिते-पाटील यांनी जिल्ह्यात ‘ए-झेड’ इलेक्ट्रॉनिक्स पुरवठादाराने कमी क्षमतेच्या युपीएस बॅटऱ्या देऊन जिल्हा परिषदेची फसवणूक केली आहे, हे खरे आहे का? असा प्रश्न उपस्थित केला होता.या प्रश्नावर उत्तर देताना लोखंडे यांनी, संबंधित पुरवठादाराने १६०० ‘व्हीएएच’ (व्होल्टेज अॅम्पिअर अवर्स) क्षमतेच्या युपीएस बॅटऱ्या पुरवठ्याची निविदा मंजूर होती. परंतु, या कंपनीने १२०० ‘व्हीएएच’ क्षमतेच्या युपीएस बॅटऱ्यांचा पुरवठा करून फसवणूक केली आहे. या प्रकरणी ‘ए-झेड’ इलेक्ट्रॉनिक्स कंपनी पुरवठादारावर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यासाठी अधिकारी गेले होते. परंतु, पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी नसल्यामुळे ते परत आले. शनिवारी गुन्हा दाखल करणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.दरम्यान, ‘ए-झेड’ इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या पुरवठादार कंपनीस जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायती, दहा पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेला युपीएस बॅटऱ्या पुरवठा करण्याचे आदेश दिले होते. १६०० क्षमतेच्या युपीएस बॅटऱ्यांचा पुरवठा करण्यासाठी त्यांची प्रति युपीएस बॅटरीची किंमत २४ हजार रुपयांची निविदा मंजूर होती. या किमतीनुसार ७१५ युपीएस बॅटरींची किंमत एक कोटी ७१ लाख ६० हजार रुपये होत आहे. (प्रतिनिधी)
‘ए-झेड’ इलेक्ट्रॉनिक्सवर फौजदारीचे आदेश : लोखंडे
By admin | Updated: January 30, 2015 23:42 IST