कुपवाड : व्याजाच्या पैशातून शहरातील
सविता महादेव गावडे या महिलेस तिघा सावकारांनी शिवीगाळ व दमदाटी करून मानसिक त्रास दिल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी शहरातील तिघा सावकारांविरोधात कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लता पाटील (रा. रामकृष्णनगर, कुपवाड), नंदकिशोर शिंदे व नेहा नंदकिशोर शिंदे (रा. गांधी कॉलनी, लक्ष्मीनगरजवळ, सांगली) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सविता गावडे कुटुंबासह रामकृष्णनगर परिसरात राहतात. गावडे यांची बेकरी आहे.
त्यांनी संशयित लता पाटील यांचे जावई नंदकिशोर शिंदे याच्याकडून दीड लाख रुपये पंधरा टक्के व्याजाने पैसे घेतले होते. या रकमेच्या मोबदल्यात गावडे यांनी शिंदे यांच्याकडे दोन तोळे सोने व शंभर रुपयांचा कोरा मुद्रांक दिला होता. त्यावर गावडे व त्यांची मैत्रीण शोभा कसबे यांच्या सह्या घेतल्या होत्या. गावडे यांनी १० नोव्हेंबर २०२० ते १८ मे २०२१ अखेर प्रत्येक महिन्याला २२ हजार ५०० रुपयेप्रमाणे नंदकिशोर यांना व्याजाची रक्कम दिली होती.
असे असतानासुद्धा मुद्दल रक्कम व उर्वरित व्याज देण्यासाठी पाटील व शिंदे यांनी गावडे यांना शिवीगाळ व दमदाटीस सुरुवात केली. त्यामुळे गावडे यांनी याबाबतची तक्रार कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार तिघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.