कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सभा, मेळावे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उत्सवास प्रशासनाने प्रतिबंध केला आहे. केवळ १०० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, मिरजेत शुक्रवारी गणेश तलाव परिसरात संयुक्त मंगळवार पेठ मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. ध्वनिक्षेपकाची परवानगी नसतानाही मोठ्याने ध्वनिक्षेपक लावल्याने गणेश तलाव परिसरात मोठी गर्दी झाली. गर्दी पांगविण्यासाठी ध्वनिक्षेपक व विद्युत रोषणाई बंद करण्याची पोलिसांनी आयोजकांना सूचना दिली. मात्र, ध्वनिक्षेपक सुरूच ठेवत गर्दी जमविल्याने ध्वनिक्षेपक यंत्रणा ताब्यात घेत पोलिसांनी जमावाला पिटाळले. याप्रकरणी आयोजक परवेज महमंदहनिफ हवालदार, सलीम गौस पठाण, दर्शन अनिल कांबळे, अक्षय सदाशिव कांबळे, प्रथमेश सुरेश ढेरे, सलीम गौस मणेर, इरशाद मेहबूब खान (सर्व, रा. मिरज) व ध्वनिक्षेपक चालक अक्षय संकपाळ (रा. गणेश तलाव मिरज) यांच्याविरुद्ध एक हजार जणांचा बेकायदा जमाव जमवून शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल मिरज शहर पोलीस ठाण्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
शिवाजी पुतळ्याजवळ, परीट गल्लीत शिवेच्छा ग्रुपतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पूजन कार्यक्रमाचे आयोजन करून विनापरवाना ध्वनिक्षेपक लावून पाचशे जणांचा जमाव जमविल्याने आयोजक सौरभ प्रसाद पोतदार (वय १९), ओंकार संभाजी साळुखे (१९), प्रसाद मिलिंद शिवनगी (१९), मुस्तफा शानुर मंगळवारे (१९), अनिकेत अर्जन रखवालदार (१९), वाजीद राज शिकलगार (३२, सर्व, रा. मिरज) यांच्याविरुद्ध ५०० ते ६०० लोकांचा बेकायदा जमाव जमवून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथ रोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.