लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना रुग्णांना औषधोपचाराबरोबर मानसिक आधाराची गरज ओळखून पंडित दिनदयाळ उपाध्याय कोविड केअर सेंटरमध्ये व्यक्तित्व विकास प्रबोधिनीच्या सहकार्याने रुग्णांचे समुपदेशन करण्यात आले.
येथील मालू हायस्कूलमध्ये आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित दिनदयाळ उपाध्याय कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. काही रुग्णांना मानसिक दडपण होते, त्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढत होता. गरोदर रुग्ण महिलेला बाळाची काळजी लागली होती. एका रुग्णाला कोरोनाच्या भीतीपोटी धाप लागत होती. अशा रुग्णांच्या अनेक मानसिक तक्रारी येत होत्या. त्यामुळे व्यक्तित्व विकास प्रबोधिनीचे डाॅ. पवन गायकवाड, पूनम गायकवाड यांच्या पथकाकडून कोविड सेंटरमधील रुग्णांचे समपुदेशन करण्यात आले.
यावेळी मानसोपचारतज्ज्ञांनी रुग्णांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रुग्णांच्या मानसिक तक्रारींचे निराकरण करत भावनिक सबलीकरण केले. प्रबोधिनीकडून महापालिकेच्या सेंटरमध्ये समुपदेशनाचे काम सुरू आहे.