आष्टा : आष्टा शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना शहरातील विविध प्रभागातील नगरसेवक गायब झाल्याचे दिसत आहेत. नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी नगरसेवकांना कोरोनामध्ये प्रभागामध्ये उपाययोजनांसाठी सक्रिय रहावे, अशा सूचना द्याव्यात, अशी मागणी शिवसेनेतर्फे केली आहे.
निवेदनावर शिवसेनेचे शहर अध्यक्ष राकेश आटूगडे, नंदकिशोर आटुगडे, सुधीर कांबळे यांनी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले की, आष्टा पालिकेचे अधिकारी-कर्मचारी कोरोना संकटात अहोरात्र काम करत आहेत; मात्र ज्या नगरसेवकांना नागरिकांनी निवडून दिले त्या नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कोरोनामध्ये नागरिकांना योग्य आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही नगरसेवकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, अशी मागणी शिवसेनेतर्फे मुख्याधिकारी डॉ. चव्हाण यांच्याकडे करण्यात आली.