सांगली : कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून महापालिकेने विनामास्क, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. पहिल्या लाटेत दहा लाख ७९ हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. त्यामानाने दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात कारवाई झाली असून, तब्बल २३ लाख रुपयांचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा झाला.
कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार कारवाईसाठी टास्क फोर्ससह पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकांनी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांमध्ये दंडात्मक कारवाईचा धडाका लावला होता.
गतवर्षी १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ अखेर बिनामास्क सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, अस्वच्छता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत दहा लाख ७९ हजार १६४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. यावेळी केवळ तीन महिन्यात यापेक्षा दुप्पट दंड वसूल करण्यात आला आहे. यावर्षी १ एप्रिल ते २ जुलैअखेर तब्बल २३ लाख ९१ हजार ४५० रुपये दंडाच्या माध्यमातून वसूल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे २ जुलै रोजी एकाच दिवसात ८५ हजार ७०० रुपयांचा दंड महापालिकेच्या पथकांनी वसूल केला आहे.
चौकट
१ एप्रिल २०२० ते आजअखेरची कारवाई
विनामास्क फिरणे : २९५७
सार्व. ठिकाणी थुंकणे : १९९
सार्व. ठिकाणी अस्वच्छता : १५८
सोशल डिस्टन्सिंगचा भंग : ८१०
खासगी आस्थापना कारवाई : १९६
इतर : २०२