विटा : विटा शहरात कोरोना संसर्ग वाढल्याने नगरपालिका व आरोग्य विभागाने शहरातील भाजी मंडई, व्यापारी संकुल तसेच प्रत्येक प्रभागातील शाळांत कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची तातडीने मोफत चाचणी होणार असून, शुक्रवारपासूनच ही मोहीम हाती घेतली आहे.
विटा शहरात लॉकडाऊनमध्येही मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. बाजारपेठेसह भाजी मंडई, शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी गर्दीचा महापूर उसळला आहे. परिणामी, शहरात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी नगरपरिषदेत माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासन व आरोग्य विभागाची बैठक झाली. नगरसेवक किरण तारळेकर, फिरोज तांबोळी, माजी नगरसेवक प्रशांत कांबळे, मुख्याधिकारी अतुल पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश लोखंडे उपस्थित होते.
यावेळी वैभव पाटील म्हणाले की, शहरात कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी आरोग्य विभागाला पालिकेचे संपूर्ण सहकार्य राहील. नागरिकांनीही निर्बंधांचे योग्य पालन करून स्वत:सह कुटुंबाची जबाबदारी घ्यावी. भाजी विक्रेत्यांसह व्यापाऱ्यांनी व्यवसाय करताना योग्य ती खबरदारी घ्यावी.
किरण तारळेकर म्हणाले की, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरात होणारे लसीकरण योग्य पध्दतीने व नियोजनबध्द करावे. कोणत्याही नागरिकाची तक्रार येऊ नये यासाठी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे.
मुख्याधिकारी अतुल पाटील म्हणाले की, कोरोना नियंत्रणासाठी वारंवार आढावा बैठक घेऊन आवश्यक ठोस उपाययोजना राबविण्यात येतील.
बैठकीस डॉ. विशाल नलवडे, डॉ. अभिजित निकम, विद्यासागर चौगुले, बाजीराव जाधव, आरोग्यनिरीक्षक आनंदा सावंत, नारायण शितोळे उपस्थित होते. प्रशांत कांबळे यांनी आभार मानले.
फोटो - ०८०७२०२१-विटा-नगरपरिषद : विटा नगरपरिषदेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांबाबत गुरुवारी आरोग्य विभाग व पालिका प्रशासनाची बैठक झाली.