लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यास कोरोना रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मुक्त संचार कारणीभूत ठरत आहे. याचा ग्रामस्थांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे मत प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी व्यक्त केले. कसबे डिग्रज येथे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी दक्षता समितीची आढावा बैठक झाली.
यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार डी. एस. कुंभार, सांगली ग्रामीण पोलीस निरीक्षक रवींद्र बेंद्रे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सलगर, जि. प. सदस्य विशाल चौगुले, अरुण पवार, आरोग्य अधिकारी डॉ. शरद कुवर, ग्रामविकास अधिकारी डी. आर. कुंभार, मनोज कोळी आदी उपस्थित होते.
समीर शिंगटे म्हणाले, कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाग्रस्ताच्या कुटुंबातील लोक फिरत आहेत. अलगीकरण कक्षाची सोय असतानाही अनेक जण घरांमध्येच राहत असल्याने कुटुंबात कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे होम आयसोलेशनमधील असलेल्या कोरोना रुग्णांना तत्काळ गावातील अलगीकरण कक्षामध्ये पाठविण्याबाबत सूचना दिल्या. जर काही रुग्ण अथवा नातेवाईक नकार देत असतील तर त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
कोरोना सर्वेक्षण करताना शिक्षक, आशा सेविका यांच्या अडचणीबाबत चर्चा करण्यात आली. व्याख्याते वसंत हंकारे यांच्या कोरोना मुक्तीसाठी सुरू असलेल्या उपक्रम स्तुत्य असून इतरही कोविड सेंटर अथवा अलगीकरण कक्षामध्ये कार्यक्रम घेण्यासंदर्भात चर्चा झाली.