वाळवा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. अशा काळात वाळव्यामध्ये विधायक गणेशोत्सव साजरा व्हावा, गतवर्षीप्रमाणे यंदाही एक गाव एक गणपती उपक्रम राबवा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी केले.
वाळवा येथे गणेशोत्सव शांतता कमिटी बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच डॉ शुभांगी माळी, आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद, उपनिरीक्षक मनोज सुतार, ग्रामपंचायत सदस्य व हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद थोरात, वर्धमान मगदूम, बाळासाहेब आचरे प्रमुख उपस्थित होते.
कृष्णात पिंगळे म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाबाबत घालून दिलेल्या अटी पाळल्या नाहीत तर गुन्हा दाखल होणार आहे. तेव्हा गणेशोत्सव काळात गुन्हे दाखल झाले तर खूप अवघड असते. युवकांच्या करिअरचा प्रश्न आहे? तेव्हा शासकीय निर्बंध पाळून कोरोनाला पळवून लावण्यासाठी, क्रांतिकारक वाळव्यातून एक गाव एक गणपती उपक्रम राबवावा.
पोलीस उपनिरीक्षक मनोज सुतार यांनी आभार मानले. आष्टा पोलीस ठाण्याचे वतीने बैठकीचे आयोजन व संयोजन करण्यात आले होते.