सांगली : दिघंची (ता. आटपाडी) येथील राहुल लोणकर या बांधकाम कामगाराच्या खात्यावर पत्नीच्या प्रसूती शस्त्रक्रियेचा खर्च म्हणून २० हजार रुपये वर्ग करण्यात आले. त्याच्या पाठपुराव्याला अधिकारी, राजकीय नेत्यांनीही साथ दिली.
लोणकर यांच्या पत्नीची प्रसूती शस्त्रक्रियेद्धारे मागील वर्षी झाली होती. राहुल हा बांधकाम मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे. त्याने सीझरचा झालेला
खर्च मंडळाच्या वेबसाईटवर टाकला होता. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही त्याला पैसे मिळाले नव्हते. म्हणून त्याने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना संपर्क साधून व्यथा सांगितली. बांधकाम कामगारांचे प्रश्नांबाबत डॉ गोऱ्हे यांनी बांधकाम मंत्र्यांशी संपर्क साधला. राहुल लोणकर यांच्या प्रकरणात डॉ.
गोऱ्हे, सचिव रवींद्र खेबुडकर यांनी पाठपुरावा केला. सांगलीचे सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनीही कागदपत्रांबाबत पाठपुरावा केला.
त्यामुळे लोणकर यांच्या खात्यावर २० हजार रुपये वर्ग करण्यात आले. लोणकर यांनी याबाबत गोऱ्हे, खेबुडकर व अनिल गुरव यांचे आभार मानले.