भाजप नव्हे, कॉँग्रेसच कॉँग्रेसचा पराभव करेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:06 AM2017-09-24T00:06:18+5:302017-09-24T00:06:18+5:30

सांगली : कार्यकर्त्यांचे हत्तीचे बळ असूनही नेत्यांमधील गटबाजीने कॉँग्रेसचे नुकसान होत आहे.

Congress will defeat Congress instead of BJP | भाजप नव्हे, कॉँग्रेसच कॉँग्रेसचा पराभव करेल

भाजप नव्हे, कॉँग्रेसच कॉँग्रेसचा पराभव करेल

Next
ठळक मुद्देकार्यकर्त्यांचा इशारा : नेत्यांमधील गटबाजीबद्दल संताप

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कार्यकर्त्यांचे हत्तीचे बळ असूनही नेत्यांमधील गटबाजीने कॉँग्रेसचे नुकसान होत आहे. त्यांना प्रथम एकत्र करा, अन्यथा, आगामी महापालिका निवडणुकीत भाजप नव्हे, कॉँग्रेसच कॉँग्रेसचा पराभव करण्याची शक्यता आहे, असा इशारा कार्यकर्त्यांनी कॉँग्रेसच्या ब्लॉक कमिटीच्या बैठकीत दिला.

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने कॉँग्रेसच्या उत्तर विभागाच्या ब्लॉक कमिटीची बैठक गुजराती हायस्कूलजवळील एका सभागृहात झाली. यावेळी माजी नगरसेवक अजित सूर्यवंशी, कय्यूम पटवेगार, नितीन चव्हाण, आनंद लेंगरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका स्वीकारत नेत्यांनाच शहाणपणाचे डोस पाजले. पक्षाच्या कार्यकर्त्यांची बांधणी करण्यापूर्वी नेत्यांनाच शहाणपणाच्या चार गोष्टी सांगून त्यांची घडी बसवा, असा सल्ला त्यांनी उपस्थित नेत्यांना दिला.

वसंतदादांचा सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता व आजही आहे; पण दुर्दैवाने नेत्यांची गटबाजी, कुरघोड्यांतूनच काँग्रेसला ग्रहण लागले. हे ग्रहण संपणार तरी कधी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.नगरसेवक प्रशांत मजलेकर म्हणाले, नेत्यांतील मतभेद, मनभेद मिटवायला हवेत. गटाने पक्षच नव्हे, ते नेतेही संपतील. महापालिकेत काँग्रेसला जनतेने एकहाती सत्ता दिली. पण गटबाजीने सत्तेला अडसर झाला आहे. आता तर प्रशासनाच्या माध्यमातून कामांची अडवणूक चालू आहे. आम्ही लढत आहोतच; पण यापुढे जर कामे झाली नाहीत, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.

कय्यूम पटवेगार, राजन पिराळे म्हणाले, जेथे भाजपसारख्या जातीयवादी पक्षाला पाय ठेवायला जागा नव्हती, तेथे केवळ नेत्यांच्या दुहीने भाजपने हातपाय पसरले आहेत. काँग्रेससारखे तळागाळाचे नेतृत्व कोणत्याही पक्षाकडे नाही. फक्त नेत्यांनी हे मनावर घ्यायला हवे. अजित सूर्यवंशी, बाहुबली कबाडगे म्हणाले, अंतर्गत वाद आणि वर्चस्ववाद विसरून पक्षासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. ते न झाल्यास महापालिका निवडणुकीत भाजपला आयते कोलित मिळेल. त्यामुळे आता तरी नेत्यांनी एकसंधपणा दाखवावा.

यावेळी स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब पाटील, मदनभाऊ युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक संतोष पाटील, दिलीप पाटील, वंदना कदम, नंदकुमार अंगडी, राजन पिराळे, नितीन चव्हाण, शशिकांत नागे, दलितमित्र अशोक पवार, अशोक पाटील, नंदकुमार साळुंखे, अल्ताफ पेंढारी, रवी खराडे, विक्रम वाघमोडे, प्रमोद सूर्यवंशी, शीतल सदलगे, मुबारक मौलवी, ईलाही बारुदवाले आदी उपस्थित होते.

मनोमीलन घडविणारच : पृथ्वीराज पाटील
शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांच्या भावना योग्य आहेत. काँग्रेसची ताकद ही नेत्यांच्या दुहीतूनच दुभंगली आहे. त्यासाठी लवकरच सर्वच नेत्यांना एकत्र करून मनोमीलन घडविण्यात येईल. जर ते ऐकत नसतील तर, आपणच कार्यकर्ते दबावगट निर्माण करू. शेवटी नेत्यांची ताकद आपल्यावर आहे. त्यामुळे त्यांना एकत्र यायला भाग पाडू. पक्ष टिकला तर नेते आणि आपणही टिकणार आहोत. महापालिका क्षेत्रातील कामे राजकीय हेतूने अन्य पक्षाने अडवूनही पदाधिकारी, नेते गप्प आहेत. त्यांनाही याबद्दल जाब विचारू.
पक्षामुळे नगरसेवक व अन्य पदे मिळूनही जे पक्षाच्या बैठक, सभा, कार्यक्रमांना येत नाहीत, त्यांचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे पाठवा. एकाच घरातील उमेदवारीची मक्तेदारी बंद करा. यापुढे जर अशा लोकांमध्ये सुधारणा झाली नाही, तर त्यांना उमेदवारीसुद्धा देऊ नये. असे झाले नाही, तर कार्यकर्त्यांना संधी मिळणार तरी कधी, असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Congress will defeat Congress instead of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.