फोटो : २३०२२०२१ उमेश पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : महापालिकेतील भाजपच्या सत्तेला अखेर सुरुंग लावण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला मंगळवारी यश आले. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी यांनी भाजपचे धीरज सूर्यवंशी यांचा ३९ विरुद्ध ३६ मतांनी पराभव केला, तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेश पाटील यांनी भाजपच्या गजानन मगदूम यांच्यावर मात केली. भाजपची सात मते फुटल्याने अडीच वर्षांतच भाजपला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले.
महापालिकेत एकूण सदस्यसंख्या ७८ असून, दोन सहयोगी सदस्यांसह भाजपचे संख्याबळ ४३ आहे, तर काँग्रेसचे १९ व राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक आहेत. काँग्रेसचे माजी महापौर हारुण शिकलगार यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त आहे. बहुमत असतानाही यंदा महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत सात मते फुटल्याने भाजपला हार पत्करावी लागली. महापौरपदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी, तर काँग्रेसकडून उत्तम साखळकर, राष्ट्रवादीतून मैनुद्दीन बागवान, दिग्विजय सूर्यवंशी यांनी, तर उपमहापौरपदासाठी भाजपकडून गजानन मगदूम, काँग्रेसकडून उमेश पाटील, राष्ट्रवादीतून सविता मोहिते व स्वाती पारधी यांनी अर्ज दाखल केले होते. मंगळवारी सकाळपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीचा महापौरपदाचा उमेदवार निश्चित नव्हता. अखेर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिग्विजय सूर्यवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेअकराला महापौर-उपमहापौर निवडीच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. ऑनलाईन पद्धतीने प्रथमच मतदान घेण्यात आले. प्रथम महापौरपदाच्या अर्जांची छाननी झाली. सर्व अर्ज वैध ठरल्यानंतर अर्ज माघारीसाठी पंधरा मिनिटांचा अवधी देण्यात आला. या कालावधीत मैनुद्दीन बागवान यांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर दिग्विजय सूर्यवंशी व धीरज सूर्यवंशी यांच्यात महापौरपदासाठी लढत झाली. ऑनलाईन हात वर करून मतदान नोंदविण्यात आले. यात दिग्विजय सूर्यवंशी यांना ३९, तर धीरज सूर्यवंशी यांना ३६ मते मिळाली. पीठासीन अधिकाऱ्यांनी दिग्विजय सूर्यवंशी यांची महापौरपदी निवड झाल्याची घोषणा केली. त्यानंतर उपमहापौरपदासाठी निवडणूक झाली. यात काँग्रेसचे उमेश पाटील यांना ३९, तर भाजपचे गजानन मगदूम यांना ३६ मते मिळाली. अडीच वर्षांतच महापालिकेतील सत्तेवरून भाजपला पायउतार व्हावे लागले.
चौकट
पाचजणांचे मतदान, दोघे तटस्थ
राष्ट्रवादीने भाजपचे नऊ नगरसेवक फोडून अज्ञातस्थळी हलविले होते. त्यापैकी दोघे स्वगृही परतले, पण सात नगरसेवक मात्र शेवटपर्यंत ‘नाॅट रिचेबल’ होते. ही सातही मते फुटली. त्यातील महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, नसिमा नाईक, अपर्णा कदम, विजय घाडगे या पाचजणांनी उघडपणे राष्ट्रवादी व काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान केले, तर माजी उपमहापौर आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे तटस्थ राहिले. या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
चौकट
भाजपच्या उमेदवारांनी सभागृह सोडले
निवडीसाठी भाजपचे धीरज सूर्यवंशी व गजानन मगदूम महापालिकेतील सभागृहात उपस्थित होते. दोघांच्या चेहऱ्यावर तणाव होता. महापौरपदासाठी भाजपच्या पाच फुटीर सदस्यांनी आघाडीला मतदान करताच सूर्यवंशी व मगदूम यांनी सभागृह सोडले. काँग्रेसचे संतोष पाटील महापालिकेत होते. आघाडीचे उर्वरित सदस्य कोल्हापुरातील एका हाॅटेलवर, तर भाजपचे सदस्य सांगलीतील एका मंगल कार्यालयातून ऑनलाईन सहभागी झाले होते.
चौकट
निवड प्रक्रियेवर आक्षेप
ऑनलाईन निवड प्रक्रिया सुरू होताच सभागृहातील स्क्रीनवर पाचजणांचे व्हिडिओ बंद होते. त्यावर ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांचे मतदान कसे घेणार, ही प्रक्रिया बरोबर नाही, असा आक्षेप धीरज सूर्यवंशी यांनी घेतला. त्यावर डुडी यांनी ते ऑनलाईन आले तर त्यांचे मत नोंदविले जाईल, अन्यथा मत ग्राह्य धरणार नाही, असे स्पष्ट केले.
चौकट
ऑनलाईन प्रक्रिया सुरळीत
महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. सभागृहात दोन मोठे स्क्रीन बसविले होते. पीठासीन अधिकाऱ्यांसाठी लॅपटाॅपची व्यवस्था केली होती. मतदान प्रक्रियेत कोठेही बाधा आली नाही. जितेंद्र डुडी यांनी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस व सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते व अधिकाऱ्यांच्या नियोजनाचे कौतुक केले.