सांगली : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडी उद्या (रविवारी) होत आहेत. यानिमित्त कॉँग्रेसने शनिवारी घेतलेल्या बैठकीत सदस्यांनी सत्तेत निम्म्या वाट्याची मागणी केली. सदस्यांनी व तालुकाप्रमुखांनी मांडलेल्या या मागणीचा प्रस्ताव कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्याकडे पाठविला. रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी नेत्यांनी या प्रस्तावावर चर्चा सुरू होती. रविवारी सकाळी या प्रस्तावावर व पदांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे दोन्ही जिल्हाध्यक्षांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यांचे एकूण अधिकृत संख्याबळ ३३ आहे. दोन अपक्ष व जनसुराज्य शक्ती पक्षाच्या एका सदस्याच्या पाठिंब्याने हे बळ ३६ वर जाते. तरीही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भाजप व शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांच्या नेतृत्वाखालील सदस्य संख्या ९ आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला या नऊ सदस्यांच्या भूमिकेची चिंता आहे. ‘व्हिप’ बजावला असला, तरी धास्ती कायम आहे. अशातच कॉँँग्रेसने राष्ट्रवादीकडे आघाडी करण्याबाबत प्रस्ताव दिला होता. यासंदर्भात कॉँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य व तालुकाअध्यक्षांची बैठक दुपारी कॉँँग्रेस भवनात पार पडली. मोहनराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. राज्यात अजूनही आघाडीचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेत राष्ट्रवादीने निम्मा वाटा देऊन आघाडीचा आदर्श राज्यासमोर ठेवावा, अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली. निम्मा वाटा मिळावा, याबाबत बहुतांश सदस्य व तालुकाप्रमुख आग्रही आहेत. त्यामुळे कदम यांनी तसाच प्रस्ताव राष्ट्रवादीकडे दिला आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. काँँग्रेसने राष्ट्रवादीस रविवारी सकाळी १0 वाजेपर्यंत निर्णय घ्यावा, असे सूचविले आहे. त्यानुसार उद्या आघाडीच्या भवितव्याचा फैसला होईल.जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे. अध्यक्ष पदासाठी तासगाव तालुक्यातील सावळजच्या कल्पना सावंत, येळावीच्या स्नेहल पाटील, मणेराजुरीच्या योजना शिंदे, चिंचणीच्या शुभांगी पाटील प्रमुख दावेदार आहेत. या स्पर्धेत दिघंची (ता. आटपाडी) येथील जिल्हा परिषद गटातील सदस्या मनीषा पाटील यांचे नाव आले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील सदस्या आणि महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती राधाबाई हाक्के यांचेही नाव चर्चेत आहे. त्यांच्यासाठी राष्ट्रवादी नेते व गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)
कॉँग्रेसला हवा सत्तेत निम्मा वाटा
By admin | Updated: September 21, 2014 00:44 IST