सांगली : शहरातील काळी खण सुशोभिकरणाचा प्रारंभ रविवारी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पण या कार्यक्रमावर काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्यासह नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता. सुशोभिकरणाशी राष्ट्रवादीचा काडीमात्र संबंध नसतानाही केवळ श्रेयासाठी उद्घाटने घेण्याचा सपाटा लावला आहे. या कामाचा पाठपुरावा करणाऱ्या नगरसेवकांनाही निमंत्रण देण्यात आले नसल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.
काळी खण सुशोभिकरणासाठी एक कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. जिल्हा नियोजन समितीतील दलित वस्ती सुधार योजनेतून या कामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. तत्कालीन महापौर गीता सुतार यांच्या काळात त्याला मान्यता देण्यात आली. काँग्रेसच्या नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी या कामाचा पाठपुरावा केला होता. आयुक्त नितीन कापडणीस यांनी काळी खण सुशोभिकरणासाठी पुढाकार घेतला होता. पण सत्ताबदल होताच राष्ट्रवादी शहरातील विविध विकासकामे हायजॅक करत आहे. सत्ताबाह्य मंडळींनी सत्तेचा वापर करीत मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसलाही डावलले असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
रविवारी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, समाजकल्याण सभापती स्नेहल सावंत, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, उपायुक्त राहुल रोकडे, नियोजन समिती सदस्य संजय बजाज, पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दिन बागवान, शेखर माने आदी उपस्थित होते. काँग्रेसचे उपमहापौर उमेश पाटील वगळता सर्वच नगरसेवकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर अनुपस्थित होते.
चौकट
कोट
राष्ट्रवादीकडून मनमानी : निंबाळकर
काळी खण सुशोभिकरणासाठी आम्ही तीन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहोत. आयुक्त नितीन कापडणीस, माजी महापौर गीता सुतार यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर झाला. पण या कामाचे श्रेय लाटण्याचा उद्योग राष्ट्रवादीकडून सुरू आहे. भूमिपूजनाला किमान वाॅर्डातील चारही नगरसेवकांना निमंत्रण देण्याची आवश्यकता होती. निमंत्रण पत्रिकेवर नेत्या जयश्रीताई पाटील यांचेही नाव घातले नाही. ही राष्ट्रवादीची मनमानी असल्याचा आरोप नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी केला.