लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : रमजान ईद साजरी करण्यासाठी मुस्लीम बांधवांना लॉकडाऊन व संचारबंदीच्या नियमात शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवामोर्चाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
मोर्चाचे जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांना निवेदन दिले. यावेळी अशरफ वांकर, इम्रान शेख, अमित गडदे आदी उपस्थित होते. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मुस्लीम समाजासाठी अत्यंत पवित्र असणारा रमजान महिना सुरू आहे. १४ मे रोजी रमजान ईद असून, जिल्ह्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मुस्लीम बांधवांना हा सण साजरा करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.
सोलापूर व लातूर जिल्हा प्रशासनाने काही अटींवर रमजान ईद साजरी करण्यास त्यांच्या जिल्ह्यात काही प्रमाणात शिथिलता दिलेली आहे. त्याचप्रमाणे, आपल्या जिल्ह्यातही काही अटींवर मुस्लीम बांधवांना ईद साजरी करण्यासाठी शिथिलता द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावर जिल्हाधिकारी म्हणाले की, सगळे सण साजरे व्हावेत, असे मलाही वाटते, पण जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, याबाबत आता कोणताही निर्णय घेणे शक्य नाही.