सांगली : वसंतदादा कारखान्याच्या जागा विक्रीबाबत काही न्यायालयीन वाद निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कारखाना व्यवस्थापनावर राहील, यासह काही अटीवर महापालिका आयुक्त अजिज कारचे यांनी रेखांकनाला मंजुरी दिली आहे. या मंजुरीनंतरच कारखान्याने जागा विक्रीच्या लिलावाची प्रक्रिया हाती घेतली आहे. वसंतदादा कारखान्याकडील शेतकऱ्यांच्या थकित बिलासाठी जमीन विक्रीस शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार कारखान्याची २१ एकर जमीन विक्रीस काढण्यात आली. या जागेत १०३ प्लॉट पाडण्यात आले असून पाचशे चौरस मीटरपासून ते एक हजार स्वेअर मीटरपर्यंत प्लॉट पाडले आहेत. त्यासाठी अडीच लाखापासून ते दहा लाखापर्यंत बयाणा रक्कम निश्चित केली आहे. निविदा दाखल करण्यासाठी १४ आॅक्टोेबरपर्यंतची मुदत आहे. या विक्रीतून शेतकऱ्यांच्या देण्यांसाठी ५० टक्के व बँकेच्या कर्जासाठी ५० टक्के रक्कम दिली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समितीही नियुक्त करण्यात आली आहे. दरम्यान, वसंतदादा कारखान्याच्या रेखांकनाला महापालिकेने काही अटींवर मान्यता दिली आहे. कारखान्याच्या कामगारांनीही थकित देण्यांसाठी तगादा लावला आहे. तसेच काही बँकांनीही कर्जाच्या रकमेची वसुली करण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. त्यामुळे भविष्यात न्यायप्रविष्ट बाब झाल्यास त्यास महापालिका जबाबदार राहणार नाही, असे मंजुरीवेळी स्पष्ट करण्यात आले आहे. या जागेत शेकडो झाडे आहेत. ती तोडताना महापालिकेच्या उद्यान विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. उद्यान विभागाकडे परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर नव्याने वृक्षलागवड करण्याची अटही घातली जाणार आहे. त्याशिवाय रस्ता रुंदीकरणासाठी काही जागा द्यावी लागणार असल्याचे स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)शंभर कोटींची अपेक्षावसंतदादा कारखान्याकडे शेतकऱ्यांची थकित देणी, जिल्हा बँकेचे कर्ज, कामगारांची देणी यासह चालू हंगामातील गळितासाठी कोट्यवधी रुपये लागणार आहेत. या जमिनी विक्रीतून कारखान्याला शंभर कोटी रुपयांची अपेक्षा आहे. त्यापेक्षा कमी किंमत आल्यास कारखान्यासमोरील अडचणींत वाढ होईल. शंभर कोटी मिळूनही सर्व देणी भागणार नाहीत.
वसंतदादा कारखान्याच्या रेखांकनाला सशर्त मंजुरी
By admin | Updated: September 17, 2014 23:05 IST