मिरज : मिरज तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींची निवडणूक सप्टेंबरमध्ये होणार असून या ग्रामपंचायतींची प्रभाग रचना पूर्ण झाली आहे. लोकसंख्या वाढल्याने चार गावात एक प्रभाग व दोन सदस्य वाढले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. तालुक्यातील डोंगरवाडी, लक्ष्मीवाडी, लिंगनूर, मल्लेवाडी, शिंदेवाडी, आरग, भोसे, एरंडोली, कळंबी, कवलापूर, मालगाव, शिपूर, तानंग, चाबुकस्वारवाडी, विजयनगर, अंकली, ढवळी, इनामधामणी, कर्नाळ, कवठेपिरान, म्हैसाळ, तुंग या ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबरपर्यंत संपत आहे. या ग्रामपंचायती काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. ग्रामपंचायतींची जुनी प्रभाग रचना बदलण्यात आली असून, लोकसंख्येत वाढ झाल्याने प्रत्येक प्रभागाची मतदारसंख्या वाढली आहे. अंकली, कळंबी, इनामधामणी व कर्नाळ या चार गावांच्या लोकसंख्येत मोठी वाढ झाल्याने या गावात एक प्रभाग वाढला आहे. एका प्रभागातील दोन सदस्यांची संख्या वाढल्याने या गावांतील राजकीय परिस्थिती बदलणार आहे. नवीन प्रभाग रचनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून निवडणूक सूचनेपूर्वी आरक्षित प्रभाग निश्चित होणार आहेत.
मिरज ग्रामपंचायतींची प्रभाग रचना पूर्ण
By admin | Updated: January 25, 2015 00:43 IST