कुपवाड : महापालिकेच्या वारणाली येथील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामास सुरुवात झाली आहे. हॉस्पिटल बांधकामाच्या ठिकाणी मुरुमीकरण, शेड, वीज व्यवस्था अशा प्रकारचे काम सुरू झाले आहे. मात्र हाॅस्पिटलच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम लांबणीवर पडला आहे.
प्रभाग आठमधील वारणाली येथील नियोजित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा दावा दिवाणी न्यायालयाने नुकताच फेटाळला. तत्पूर्वी शासनाच्या नगरविकास विभागाने दि. १९ सप्टेंबर २०११ रोजी झालेल्या महासभेचा ठराव विखंडित केला होता. त्यामुळे वारणाली येथील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीतील सर्व अडथळे दूर झाले. आता महापालिकेने बांधकामासाठी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.
शनिवारी (दि. १९) रोजी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार होता. मात्र कोरोनामुळे भूमिपूजन कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. भूमिपूजन कार्यक्रम लांबणीवर गेला असला तरी हॉस्पिटलच्या उभारणीच्या अनुषंगाने कामास सुरुवात झाली आहे. नियोजित हॉस्पिटल बांधकामाच्या ठिकाणी मुरुमीकरण, शेड, विजेची व्यवस्था आदी कामे सुरू झाली आहेत.
प्रभाग आठचे नगरसेवक विष्णू माने यांनी या कामाच्या ठिकाणी भेट दिली. या हॉस्पिटलच्या बांधकामाची निविदा पाच कोटींची असून, ५० बेडची व्यवस्था आहे. कोरोना कालावधीत हे हॉस्पिटल सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नियम शिथिल झाल्यानंतर भूमिपूजनाचा कार्यक्रमही होणार आहे.
फोटो : २० कुपवाड १
ओळ : कुपवाडमधील वारणाली येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाच्या ठिकाणी मुरुमीकरण आणि शेडची कामे सुरू झाली आहेत.