सांगली : सेंद्रिय कृषी मालाला योग्य भाव व बाजारपेठ मिळावी यासाठी रानभाज्या महोत्सव व कृषी मॉल ही संकल्पना संजीवनी ठरेल, असा विश्वास पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
सांगलीत कृषी विभाग व नियोजन समितीद्वारा आयोजित रानभाज्या महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ॲग्री मॉलचे उद्घाटनही त्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, कृषी मॉलचे भविष्यात विस्तारीकरण करावे. सेंद्रिय उत्पादकांना हक्काच्या बाजारपेठेसाठी प्रयत्न व्हावेत. योग्य दर व उत्पादनासाठी कृषी विभागाने गतीने काम करावे. शेतकऱ्यांचे गट बनवून योजनांमधून लाभ द्यावेत. जिल्ह्यात दीड हजार शेतकरी सेंद्रिय उत्पादने घेतात, ती ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी रानभाज्या महोत्सव चांगला पर्याय आहे.
यावेळी त्यांनी सेंद्रिय गूळ, गुळापासून बनवलेल्या कॅंडी, सेंद्रिय हळद, खिल्लार गाईचे देशी तूप यांचा स्वाद घेतला. ॲग्री मॉलमध्ये १४ शेतकरी व सात सेंद्रिय उत्पादन कंपन्या सहभागी झाल्या आहेत.