लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : विजयनगर परिसरातील नैसर्गिक नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. त्यामुळे हा नाला बंदिस्त करावा, अशी मागणी नगरसेविका सविता मदने यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
मदने यांनी यासंदर्भात पालकमंत्र्यांना निवेदनही दिले. त्या म्हणाल्या की, प्रभाग १९ मध्ये हा सर्वात मोठा नाला आहे. हा नाला नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापासून जातो. हा भाग रहदारीचा व वर्दळीचा आहे. या नाल्याला पूरसंरक्षक भिंत नसल्याने अनेकदा नाल्यातील पाणी नागरिकांच्या घरात शिरते. त्याचा त्रास नागरिकांना होतो. विजयनगर ते कुंभारमळामार्गे धामणीकडे जाणाऱ्या या नाल्याला आरसीसी बांधकाम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आयुक्तांना नाला बंदिस्त करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश द्यावेत तसेच जिल्हा नियोजनमधून त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
फोटो ओळी :- विजननगर नाल्याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांना नगरसेविका सविता मदने यांनी निवेदन दिले. यावेळी आयुक्त नितीन कापडणीस, नगरसेवक विष्णू माने उपस्थित होते.