फोटो ओळी : कुंडलापूर (ता. कवठेमहंकाळ) येथील सरदार शहाजी राणोजी शिंदे यांच्या समाधीची स्थानिक युवकांनी स्वच्छता केली.
घाटनांद्रे : कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) येथील सरदार शहाजी राणोजी शिंदे यांच्या समाधी स्थळाची स्थानिक युवकांनी पूर्णत: स्वच्छता केली असून, यापुढेही या वास्तूची चांगल्या प्रकारे देखभाल केली जाईल, असे या वेळी या युवकांनी सांगितले.
कुंडलापूरच्या दक्षिणेला हे ऐतिहासिक असे सरदार शहाजी राणोजी शिंदे यांची दुरवस्था झालेले समाधी स्थळ आहे. या स्थळाचे संपूर्ण प्लॅस्टर निकामी झाले असून, चिराही निखळल्या आहेत. तर संपूर्ण स्मारक स्थळ हे झाडांच्या विळख्यात अडकल्याने ते जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. याविषयी विविध वृतपत्रांतून वेळोवेळी आवाज उठवून जाग आणण्याचा प्रयत्न केला.
त्या वेळी तत्कालीन उपविभागीय अधिकारी समीर शिंगोटे व शिल्पा ठोकडे यांनी या समाधी स्थळाला भेट देऊन पाहणी केली होती. पुढे यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
याबाबत कुंडलापुरातील स्थानिक युवकांनी एकत्रित येऊन या वस्तूची स्वच्छता केली व पडझड रोखण्याचा संकल्प केला आहे. शुभम चव्हाण, रोहित जगताप, हृषीकेश चव्हाण, प्रतीक पाटील, पांडुरंग पाटील, अभिजित साबळे, अनिकेत पाटील, संकेत चव्हाण, श्रीकृष्ण पाटीलसह युवकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.