फोटो : ०७ शीतल ०१
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील खणभागात सध्या रस्त्यावर खुदाई केलेल्या चरी मुजविण्याचे काम सुरू आहे. या कामातही ठेकेदारांकडून गडबड केली जात आहे. चरी दुरुस्तीचे कामात मलमपट्टी सुरू असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते युसुफ मेस्त्री यांनी महापालिकेकडे केली आहे.
मेस्त्री म्हणाले की, खणभागातील प्रभाग १६ मध्ये दोन वर्षांपूर्वी विजेची वाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले. त्यासाठी बहुतांश रस्त्यांची खुदाई करण्यात आली. सध्या या चरी दुरुस्तीचे काम सुरू आहे. साधारणपणे चरी दुरुस्त करताना दोन ते तीन फुट उकरून मुरूम, दगडी सोलिंग, खडीकरण, बीबीएम व हॉटमिक्स डांबरीकरण अशी पद्धत आहे, पण ठेकेदारांकडून केवळ मलमपट्टी केली जात आहे.
चरी उकरून दुरुस्त करण्याऐवजी थेट बीबीएमचे काम केले जात आहे. या कामाची चौकशी करून अंदाजपत्रकाप्रमाणे काम व्हावे. गेल्या अडीच वर्षांत बरीच बोगस व निकृष्ट दर्जाची कामे झाले आहेत. या कामाचेही लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी शहर अभियंत्याकडे केली आहे. महापालिकेने त्यावर कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.