सांगली : येथील शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण शाखेतील (डीबी) पथकाच्या अनागोंदी कारभाराची जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी गंभीर दखल घेऊन केलेली खरडपट्टी ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह डीबी पथकाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. पोलीसप्रमुखांना खूश करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून ताब्यात असलेल्या चोरीतील गुन्हेगारांना अटक दाखवून कागदोपत्री एक-दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. प्रत्यक्षात अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरीतील ऐवजही मोठ्या प्रमाणात जप्त केला आहे. परंतु कागदोपत्री त्याची कुठेही नोंद केली नसल्याची चर्चा आहे. सहा महिन्यांपूर्वी पंचशीलनगरमधील शशिकांत पावसकर या तरुणाच्या खुनाचे गूढ उकलण्यात डीबी पथकाला यश न आल्याने पोलीसप्रमुख सावंत यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. खुनाचा छडा लावतो, असे पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले होते. तपासात त्यांनी पावसकरचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघडकीस आणले होते. खुनाचे कारण स्पष्ट होत असेल तर, मग मारेकऱ्यांची नावे का निष्पन्न होत नाहीत? यावरुन हा तपास संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सावंत यांचे दुर्लक्ष झाल्यानंतर पथकाने हा तपास गुंडाळला. तपासात अनेक ‘घडामोडी’ घडल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानेही पुढे तपासात लक्ष दिले नाही. धागेदोरे लागत नाहीत, म्हणून डीबी पथकाने पावसकरचे वडील व भावावर संशय व्यक्त करुन त्यांना ताब्यात घेतले होते. यामुळे सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी याचाही आढावा घेऊन छडा लावण्याचे आदेश दिले आहेत.अट्टल घरफोड्या प्रदीप सकट यास अनेक दिवस ताब्यात घेऊन ठेवले होते. सावंत ‘डीबी’ पथक काय काम करते? असा सवाल करुन त्यांना बोलावून घेऊन चांगलीच खरडपट्टी केली. त्यानंतर पथकाने प्रसारमाध्यमांना सकटला अटक केल्याचे सांगून त्याच्याकडून चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याची माहिती दिली. मुख्य बसस्थानकावर डझनहून चोऱ्या झाल्या असताना त्याची कच्ची नोंद करण्याशिवाय काहीच केले नाही. गुन्हेगार सापडला आणि गुन्हा उघडकीस आला तरी पक्की नोंद करुन फिर्यादींना त्यांना गेलेला ऐवज परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. याविषयी सावंतही यांनी पथकाला चांगलेच फैलावर घेतले होते. यामुळे वाल्मिकी आवासमधील सुनीता माने या महिलेस अटक करुन तिच्याकडून मुख्य बसस्थानकावरील दोन गुन्हे उघडकीस आणल्याचे कागदोपत्री दाखखविले. प्रत्येक प्रकरणात पथक ‘तडजोडी’च्या नजरेने पाहत असल्याने त्यांच्याविषयी अत्यंत वाईट प्रतिक्रिया आहेत. (प्रतिनिधी)‘चेनस्नॅचर’ ताब्यात; पुढे काय?‘डीबी’ पथकात दोन अधिकारी व दहा ते बारा कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. हे दोन्ही अधिकारी नवीन आहेत. मात्र कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून डीबी पथकात तळ ठोकून आहेत. जुन्या कर्मचाऱ्यांचा अनुभव पाठीशी असताना हे दोन्ही अधिकारीही गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत. उलट त्यांच्या हातात-हात देऊन बसतात. आपणे जनतेचे सेवक आहोत, याचा त्यांना विसर पडला आहे. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण चांगले आहे, पण ते प्रत्यक्षात रेकॉर्डवर घेतले जात नाहीत. पथकाच्या कार्यालयात नेहमी गर्दी असते. ‘चेनस्नॅचिंग’मधील दोन संशयित आठवड्यापूर्वी पकडले आहेत. त्यांना अटक केली की नाही, त्यांच्याकडून किती गुन्हे उघडकीस आले? याची माहिती लपवून ठेवली आहे.
शहरची ‘डीबी’ अखेर ताळ्यावर!
By admin | Updated: March 30, 2015 00:13 IST