कोल्हापूर : कसबा बावडा व मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पानटपरीमधून गुटखा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवरील कारवाई रोखण्यासाठी काही आजी-माजी नगरसेवकांनी सोमवारी जोरदार फिल्डिंग लावली. स्वत: शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजर राहून कारवाई टाळण्यासाठी काही लोकप्रतिनिधींकडून दबावही टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संपत देशमुख व पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दबाव झिडकारत सहा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून अटक केली. संशयित आरोपी रहिमान काशीम मोमीन (वय ५१, रा. संकपाळ नगर, कसबा बावडा), इस्माईल रजाक इनामदार (५८), शैलेश शिवाजी उलपे (२७), अभिजित प्रकाश खोपकर (२३), तानाजी निवृत्ती पाटील (४६, रा. जाधववाडी), जावेद इब्राहिम मोमीन (४५, सरनाईक कॉलनी, जवाहरनगर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले, कसबा बावडा व मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील माधव, शिवा, यश, त्रिमूर्ती व अस्लम आदी पानशॉपमध्ये खुलेआम बेकायदेशीर गुटखा व सुगंधी तंबाखू विक्री करत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संपत देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अन्न सुरक्षा अधिकारी संतोष सावंत यांच्या पथकाच्या मदतीने सहा पानटपऱ्यांवर दुपारी चारच्या सुमारास छापा टाकून गुटखा विक्री करताना रंगेहात पकडले. या सर्व संशयितांना गुटख्याच्या मुद्देमालासह शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणले. यावेळी ही कारवाई रोखण्यासाठी काही आजी-माजी नगरसेवकांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजेरी लावली. येथील आपल्या मर्जीतील पोलिसांना त्यांनी कारवाई रोखण्यासाठी फिल्डिंग लावली, परंतु या कारवाईची माहिती पोलीस निरीक्षक चौधरी यांना समजल्याने त्यांनी आपल्या हातात काही नसल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी काही लोकप्रतिधींकडून अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सावंत व पोलीस निरीक्षक चौधरी यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु चौधरी यांनी दबाव झिडकारून सर्व संशयित आरोपींना समोर बोलावून त्यांची चांगलीच शाब्दिक धुलाई केली. गुटखा कुठून आणता, कोण तुम्हाला पुरवितो, याची माहिती त्यांनी घेतली असता गांधीनगरहून गुटखा पुरविला जातो, असे काहींनी सांगितले तर एकाने मी स्वत: कर्नाटकातून आणत असल्याचे सांगितले. त्यानुसार संशयितांना गुटखा पुरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी ठाणे अंमलदारास दिले. पोलीस ठाण्याच्या आवारात घिरट्या घालत असलेल्या नगरसेवकांनी आपली डाळ शिजत नसल्याचे समजताच तेथून काढता पाय घेतला. (प्रतिनिधी) इचलकरंजीत घरामध्ये गुटखा, सुगंधी सुपारीचा साठा जप्तइचलकरंजी : येथील बावणे गल्ली परिसरातील घरात अवैधरीत्या साठा करून ठेवलेला गुटखा, सुगंधी सुपारी व दहा हजार रुपयांची रोकड असा सुमारे एक लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सोमवारी छापा टाकून शिवाजीनगर पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी राजू हरिबा पोवार (वय ४५) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात नोंद करून हे प्रकरण अन्न व औषध प्रशासन विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे.याबाबत पोलिसांतून आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, राजस्थानी भवनसमोरील बावणे गल्लीत राजू पोवार राहतो. त्याचे घरामध्ये छोटेखानी दुकान - पानपट्टी आहे. त्याच्याकडे गुटखा व सुगंधी सुपारीचा अवैध साठा मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना समजली. त्यानुसार सोमवारी दुपारी गुन्हे शोध पथकातील पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये आरएमडी, स्टार या कंपन्यांच्या गुटख्यांसह तुलसी, आदी कंपन्यांचा सुगंधी सुपारीचा साठाही सापडला. (वार्ताहर)
शहरात आॅनर किलिंग!
By admin | Updated: May 19, 2015 00:47 IST