वाळवा : गावात गेल्या चार ते पाच महिन्यांत साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. डेंग्यू व चिकुनगुन्याने नागरिक हैराण झाले आहेत. या साथीच्या रोगांबाबत स्वच्छताकामी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष हेच प्रमुख कारण आहे, असा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष धनाजी गावडे यांनी केला.
गावडे म्हणाले, गावात गटारी तुडुंब भरून रस्त्यावरून वाहत आहेत. यामुळे डासांचे प्रमाण वाढल्यामुळे डेंग्यू व चिकुनगुन्याच्या साथीचा फैलाव सुरू झाला. नियमित रस्ते सफाई व गटारी स्वच्छता झाली असती, तर नागरिकांना याचा त्रास झाला नसता. डास प्रतिबंधक फवारण्यासुध्दा महत्त्वाच्या आहेत. नुसत्या विशिष्ट एकाच भागाची स्वच्छता केली म्हणजे संपूर्ण गावाची स्वच्छता होत नाही.
चौकट
स्वच्छता, औषध फवारणी नियमित : शुभांंगी माळी
सरपंच डाॅ. शुभांगी माळी व उपसरपंच पोपट अहिर म्हणाले, आम्ही स्वच्छता मोहीम व औषधफवारणी वारंवार केली आहे व करत आहोत. नागरिकांनी सुध्दा आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. घरातील कचरा, रिकामे प्लास्टिक तुकडे, फाटके कपडे गटारीत टाकू नयेत. पाण्याचे हौद व भांडी स्वच्छ ठेवली पाहिजेत.