सांगली : येथील जिल्हा परिषद आवारातील आण्णासाहेब पाटील जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेतील सुमारे १३ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आला आहे. सध्या याचा तपास सांगली पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखा करीत होती. गेल्या सहा महिन्यांपासून हे प्रकरण चर्चेत आहे.सहा महिन्यांपूर्वी अपहाराचे हे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी संस्थेचा संस्थापक-अध्यक्ष अण्णासाहेब पाटील याच्यासह पाचजणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये व्यवस्थापक, लिपिक व शिपायाचा समावेश होता. लिपिकासह तिघांना तातडीने अटक केली होती. मात्र अण्णासाहेब पाटीलसह दोघे फरारी होते. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी सांगली तसेच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन नामंजूर केला. यामुळे गेल्या महिन्यात पाटील न्यायालयात शरण आला होता. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्याला अटक केली होती. त्यास पोलीस कोठडीही मिळाली होती. घोटाळ्याची रक्कम मोठी असल्याने व तपासाची व्याप्ती वाढत गेल्याने हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले आहे. या प्रकरणाचा स्थानिक पोलिसांनी काय तपास केला, याची माहिती घेण्याचे काम सीआयडी विभागाकडून सुरु आहे. (प्रतिनिधी)
पतसंस्था घोटाळा प्रकरणाचा तपास सीआयडीकडे
By admin | Updated: January 28, 2015 00:57 IST