सांगली : वयाच्या ६१ व्यावर्षी सांगली ते अयोध्या हा प्रवास सायकलने पूर्ण करण्याची कामगिरी हरीपूर (ता. मिरज) येथील चिंतामणी बोडस या निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याने केली. काही दिवसांपूर्वी अपघातात पायाला दुखापत झालेली असतानाही त्यांनी तब्बल १ हजार ८५० किलोमीटर सायकल चालवली.काही दिवसांपूर्वी सांगली ते हरीपूर प्रवासादरम्यान बोडस यांना छोटा अपघात झाला. पायाला दुखापतही झाली. तरीही त्यांनी जिद्द न हारता अयोध्या प्रवास तडीस नेला. सांगलीतून सायकलने पुण्यापर्यंत २८० किलोमीटरचा प्रवास केला. तेथे सुमारे २०० जणांचा चमू सायकलनेच अयोध्येला निघाला होता. त्यामध्ये बोडस सहभागी झाले.या सर्व सायकलपटूंमध्ये ते सर्वाधिक वयाचे सायकलपटू होते. पुण्यातून बारा दिवस सायकलिंग करीत ते अयोध्येला पोहोचले. दररोज काही वेळ सायकलिंग व काही वेळ विश्रांती हा क्रम ठेवला. त्यांच्यासोबत पाटबंधारे विभागातील उपअभियंता मोहन गलांगे हेदेखील सायकलवरून सहभागी होते. परतीचा प्रवास त्यांनी वाहनातून केला.बोडस यांच्या कामगिरीचे मित्रांनी अभिनंदन केले. पंचायत समितीचे माजी सभापती अशोक मोहिते, रवींद्र आवटी, नाना मोरे, विजय मुळे, विश्वास चौगुले, प्रमोद पतंगे, शौकत तांबोळी, अरुण डोंगरे, भरत डोंगरे, अभय जोशी, प्रकाश खेडेकर, कांतिनाथ जोशी, दिलीप काळे, दीपक बनकर, दत्तात्रय काटे, बजरंग खटके आदींनी त्यांचा सत्कार केला.
सांगलीच्या ६१ वर्षीय चिंतामणी बोडस यांनी सायकलवरुन गाठली अयोध्या, १८५० किलोमीटर केले पार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 18:20 IST