आरआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या इलेक्ट्रिक सायकलीसमवेत प्राध्यापक उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा ऑटोमोबाइल अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षामधील विद्यार्थ्यांनी ई-राइट नावाची दैनंदिन जीवनामधील प्रवासासाठी पहिली इलेक्ट्रिक सायकल बनवली आहे. विद्यार्थ्यांनी केलेले हे संशोधन व्यावसायिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी ही सायकल आरआयटीच्या संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी, डिप्लोमा विभागप्रमुख डॉ. हणमंत जाधव यांच्या हस्ते वापरकर्त्यांकडे हस्तांतरित करण्यात आली.
सध्या पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे सामान्य लोकांचा दुचाकी वापरापेक्षा सायकल वापरण्याकडे कल वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी लोकांकडे आधीपासूनच उपलब्ध असलेल्या सायकलला इलेक्ट्रिक सायकलमध्ये रूपांतरित करण्याची संकल्पना मांडली आणि ती यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. त्यामुळे नवीन इलेक्ट्रिक सायकल खरेदी करण्याऐवजी लोक त्यांच्याकडे असलेली सायकल इलेक्ट्रिकमध्ये बदलू शकतात. नवीन इलेक्ट्रिक सायकल खरेदीच्या एकूण खर्चाच्या ३५ टक्के रक्कम वाचवू शकतात. तसेच ही विकसित केलेली सायकल एका चार्जमध्ये साधारण २५ ते ३० किलोमीटरपर्यंतचे अंतर पूर्ण करू शकते.
संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी, डॉ. हणमंत जाधव, ऑटोमोबाइल विभागाचे प्रमुख प्रा. राजेंद्र सरगर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या प्रकल्पाला प्रा. रणधीर चव्हाण, प्रा. महेश थोरात, प्रा. प्रवीण देसाई आणि प्रा. गजकुमार कवठेकर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.