चरण : शिराळा तालुक्यातील चरण ते सोंडोली पूल वाहतुकीसाठी बंद होता. याबाबत नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्यामुळे ‘लोकमत’ने त्याविरोधात आवाज उठविला होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी चरण ते सोडोली पूल वाहतुकीसाठी खुला केला. शेतकरी, दुकानदारांची सोय झाल्यामुळे त्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.
पूल बंद राहिल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली, विरळ, जांबूर, माळेवाडी परिसरातील शेतकऱ्याची गैरसोय होत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन जिल्ह्यातील संपर्क बंद करण्यासाठी चरण ते सोंडोली पुलावरील वाहतूक बंद केली होती. शासननिर्णय नसताना स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. कोरोना रोखण्यासाठी हा निर्णय असला तरी जवळच्या गावासाठी तो अडचणींचा ठेरला होता. खरीप हंगामासाठी बियाणे, खते खरेदीसाठीची सोंडोली ग्रामस्थांना चरण अत्यंत जवळचे ठिकाण आहे. पूल बंद केल्यामुळे ग्रामस्थांना दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर खरेदीसाठी जावे लागत होते. ग्रामस्थांची या अडचणीवर ‘लोकमत’ने आवाज उठविला. त्याची प्रशासनाने दखल घेऊन गुरुवारी सकाळी चरण ते सोडोली पूल वाहतुकीसाठी खुला केला आहे. याबद्दल परिसरातील शेतकरी, दुकानदार आणि ग्रामस्थांनी ‘लोकमत’चे आभार मानले.