मिरज : मिरज पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या निवडीची तारीख जाहीर झाली आहे. दि. २७ जून रोजी होणाऱ्या निवडीसाठी इच्छुकांनी काँग्रेस नेत्यांना साकडे घातले आहे. मात्र इच्छुकांमधील नाव निश्चितीवरुन सदस्यांत मतभिन्नता असल्याने, सभापती पदाप्रमाणे उपसभापती पदाची निवडही गाजण्याची शक्यता आहे. मिरज पंचायत समितीचा अल्प कालावधी राहिल्याने उपसभापती पदाच्या खुर्चीचा खेळ रंगणार आहे. सभापती निवडीवरून बराचसा गोंधळ झाला. नेत्यांच्या दबावात सभापती पदाची निवड पार पडली. सभापती दिलीप बुरसे यांच्या राजीनाम्याची प्रक्रिया जलद झाली. मात्र उपसभापती तृप्ती पाटील यांनी राजीनामा देऊन सव्वा महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर, आज निवडीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दि. २७ जूनला उपसभापती पदाची निवड होणार असल्याने काँग्रेसच्या इच्छुक सदस्यांनी पद मिळविण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. सभापती निवडीवेळी काँग्रेस नेत्यांनी उपसभापतीपद मागासवर्गीय सदस्यांना देण्याचा शब्द दिल्याने, या पदासाठी नरवाडचे बाबासाहेब कांबळे, वड्डीच्या राणी देवकारे व सोनीच्या अलका ढोबळे या तीन सदस्यांपैकी एकास हे पद मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी एकोप्याने दिसणाऱ्या या सदस्यांत पद मिळविण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. तिघांनी व त्यांच्या समर्थकांनी पदासाठी नेत्यांना साकडे घातले आहे. इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू असली तरी, इतर सदस्यांनी इच्छुकांपैकी कोणाचेही उघड समर्थन करण्याचे टाळल्याने मागासवर्गीय सदस्याव्यतिरिक्त अन्य कोणाला सदस्य उपसभापती निवडीच्या मैदानात उतरवणार का? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अनेक वर्षापासून पद वाटपाचा पूर्व-पश्चिमचा समतोल या निवडीत हद्दपार होण्याची शक्यता आहे. सभापती पूर्वला देताना उपसभापतीपद पश्चिम भागास दिले जायचे. मात्र यावेळी तीनही मागासवर्गीय सदस्य पूर्व भागाचे आहेत. तीनपैकी एकाची या पदावर वर्णी लागल्यास सभापती जयश्री पाटील याही पूर्व भागाच्या आहेत. दोन्ही पदे पूर्व भागाला मिळाल्यास पहिल्यांदाच पश्चिम भाग पदापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे भविष्यातील राजकारणाच्यादृष्टीने काँग्रेस नेते उपसभापती पदाच्या निवडीत संधी नेमकी कोणत्या भागाला देणार, याबाबतही उत्सुकता आहे. (वार्ताहर)विरोधी गट निवडीत उतरणार का? मिरज पंचायत समितीच्या चार वर्षाच्या कालखंडात प्रत्येक सभापती निवडीत विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज दाखल करुन काँग्रेसला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. चार महिन्यापूर्वी झालेल्या सभापती निवडीत विरोधी पक्षनेते अरुण राजमाने यांनी पुन्हा अर्ज दाखल करुन काँग्रेस नेत्यांची झोप उडवून दिली होती. काँग्रेसचे काही सदस्यही राष्ट्रवादीच्या गळाला लागले होते. काँग्रेस नेत्यांनी याची वेळीच दक्षता घेतल्याने होणारी नामुष्की टळली होती. उपसभापती पदाच्या निवडीबाबत विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस गटात अद्याप शांतता दिसून येत असल्याने, हा गट उपसभापती पदाची निवडणूक लढविणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
उपसभापती पदाची २७ रोजी निवड
By admin | Updated: June 14, 2016 00:20 IST