लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : खासदार संजयकाका पाटील यांच्या तासगाव आणि नागेवाडी साखर कारखान्यांच्या थकीत ऊस बिलांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर चड्डी मोर्चा काढला. याची दखल घेत कारखाना व्यवस्थापनाने सात कोटींचे धनादेश आंदोलकांना दिले.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली विश्रामबागमधील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाची सुरुवात झाली. ‘ऊस बिल आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘घामाचे दाम मिळालेच पाहिजेत’ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. बनियन आणि चड्डीवर मोर्चा काढलेल्या शेतकऱ्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सभेत खराडे म्हणाले, ऊस बिलांसाठी चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. बिलांअभावी शेतकरी हैराण आहेत. कोरोना व लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहेत. खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून बिले तातडीने मिळावीत.
आंदोलकांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन दिले. स्वत: लक्ष घालून कार्यवाहीची विनंती केली.
मोर्चात महेश जगताप, भरत चौगुले, राजेंद्र माने, श्रीधर उदगावे, शांतीनाथ लिंबिकाई, सुरेश वसगडे, तानाजी धनवडे, गोरख महाडिक, सचिन महाडिक, अख्तर संदे, विनायक पवार, पोपट उपाध्ये, भय्या पाटील, सुधाकर पाटील, शिवाजी पाटील आदी सहभागी झाले.
चौकट
सात कोटींचे धनादेश दिले
यादरम्यान, कारखान्याचे व्यवस्थापक आर.डी. पाटील, उद्योजक भालचंद्र पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली. संजय बेले, सर्जेराव पवार, अजित हळिंगळे, गुलाबराव यादव, भुजंग पाटील, अशोक खाडे, दामाजी डुबल, संदीप शिरोटे यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार सात कोटी रुपयांचे ११ सप्टेंबरचे धनादेश दिले. त्यामुळे बेमुदत ठिय्या आंदोलन व उपोषण स्थगित करण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांना आर.डी. पाटील, खराडे, संदीप राजोबा यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.