दत्ता पाटीलतासगाव : यावेळी अत्यंत अटीतटीची आणि बहुरंगी झालेल्या तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा असताना शहरातील तब्बल ९ हजार ४०५ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. २०१६ मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदा ११.१९ टक्क्यांनी मतदानात घट झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीपेक्षाही या निवडणुकीत प्रतिसाद अत्यंत कमी मिळाल्याचे दिसून आले.सुरुवातीच्या टप्प्यात पालिकेच्या निवडणुकीत उत्साह नव्हता. मात्र, अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर बहुरंगी लढतीमुळे निवडणुकीत चुरस वाढली. शेवटच्या दोन-तीन दिवसांत अत्यंत जोरदार प्रचार होत असल्याचे दिसून आले. विजयाची समीकरणे जुळवण्यासाठी अनेक उमेदवार स्वतःपुरते मतदान मागताना दिसत होते. सर्वच नेत्यांच्या अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई असल्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल अशी अपेक्षा होती; मात्र यंदा मतदारांनी भ्रमनिरास करत मतदानाकडे पाठ फिरवली. त्यामुळे केवळ ७०.४० टक्के इतकेच मतदान झाले. दुपारी प्रभाग क्रमांक चारच्या मतदान केंद्रावर झालेला गदारोळ देखील मतदानाची टक्केवारी कमी करण्यास कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. एकूण १२ प्रभागांपैकी प्रभाग १० मध्ये सर्वाधिक ७४.७३ टक्के मतदान झाले, तर गदारोळ झालेल्या प्रभाग ४ मध्ये सर्वांत कमी ६५.११ टक्के मतदान झाले. प्रभाग ६, ९, १० आणि ११ या चार प्रभागांत मतदानाचा टक्का सरासरीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे हे प्रभाग नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी निर्णायक ठरतील, अशी चर्चा आहे.तर प्रभाग ३, ४ आणि ५ मध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांनी पाठ फिरवली. मतदानाच्या या टक्केवारीमुळे इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली असून, निवडणूक आयोगाने निकाल लांबणीवर टाकल्यामुळे २१ डिसेंबरपर्यंत उमेदवारांची ही धाकधूक कायम राहणार आहे.
प्रभागनिहाय झालेले मतदानप्रभाग - झालेले मतदान (कंसात टक्केवारी) -१ - १६२६ (७२.५०)२. - १७३९ (७०.२४)३. - २०११ (६५.६०)४ - १८९६ (६५.११)५. - १८७५ (६८.४३)६. - २०२९ (७३.१४)७ - २१५६ (७०.५७)८. - १७२२ (६७.७७)९. - २३८० (७४.२६)१०- २३६९ (७४.७३)११. - १६९४ (७४.०७)१२. - १७५२ (६९.१७)एकूण - २३२४९ (७०.४६)