संख : घोलेश्वर (ता. जत) येथील कोडलकरवस्ती येथे तुकाराम दशरथ कोडलकर यांचे झोपडीवजा घर जळून खाक झाले. एक लाख रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये रोख ३० हजार रुपये, संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे जळले. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजता घडली.
गावापासून उत्तरेला दीड किलोमीटरवरील तांबेवाडी येथील कोडलकर वस्तीवर तुकाराम कोडलकर कुटुंबासह राहतात. तुकाराम गोवा येथे मजुरी कामास आहेत. मंगळवारी घरास अचानक आग लागली. जोराचा वारा असल्याने झोपडीने लवकर पेट घेतला. क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले. गावातील व शेजारील लोकांनी आग थोपविण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत सर्व जाळून खाक झाले होते. घरात कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. आगीत रोख ३० हजार रुपये, संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे जळाले. पोलीस पाटील इब्राहिम नदाफ, तलाठी स्वप्निल घाडगे यांनी पंचनामा केला.
घराचे स्वप्न अपुरे
तुकाराम गावाकडे घर बांधायचे म्हणून गोव्यातून ३० हजार रुपये घेऊन आले होते. ते पैसे जळून खाक झाल्याने घर बांधायचे स्वप्न अपुरे राहिले. आगीने कुटुंब उघड्यावर पडले आहे.