तासगाव : तासगाव शहरातील के. के. नगर येथील बंद बंगला चोरट्याने फोडून रोख रक्कम, सोने व चांदीचे दागिने असा सुमारे पावणेचार लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रकाश दत्तू गरूड-पाटील यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तासगावातील मार्केट यार्डच्या पाठीमागे असलेल्या के. के. नगर येथे प्रकाश गरूड-पाटील यांचा सरसाई हा बंगला आहे. मंगळवारी (दि.१८ मे) सकाळी सातच्या दरम्यान ते आपल्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाला व लोखंडी ग्रीलला कुलूप लावून कडेपूर येथे नातेवाइकांच्या मयताच्या कार्यक्रमानिमित्त कुटुंबीयांसह गेले होते. तेथील कार्यक्रम संपल्यानंतर ते शुक्रवारी (दि.२१ मे) तासगाव येथे सकाळी नऊच्या दरम्यान आले. यावेळी त्यांना बंगल्याचे बंद लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडलेले, मुख्य दरवाजाचे कडी, कोयंडा तोडल्याचे लक्षात आले. आतमध्ये प्रवेश करून चोरट्यानी हॉल व बेडरूममधील फर्निचर उचकटले आहे. बेडरूममधील लोखंडी तिजोरी कटावणीने उचकटलेली व तेथील साहित्यांची व कपडे विस्कटलेले दिसून आले. फिर्यादी यांनी फर्निचर व लोखंडी तिजोरी येथे ठेवलेल्या दागिन्यांसह रोख रकमेची पाहणी केली. यावेळी ५६ हजार रुपये रोख रक्कम, सोन्याच्या एक लाख ३५ हजार रुपयांच्या चार तोळ्यांच्या बांगड्या, अडीच तोळ्यांचा ८० हजार रुपये किमतीचा सोन्याचा राणीहार, ३० हजार रुपये किमतीचे एक तोळ्याचे सोन्याचे ब्रासलेट, आठ हजार रुपये किमतीची सोन्याची ठुशी, आठ हजार रुपयांचे सोन्याचे कानांतील टॉप्स, चार हजार रुपयांचा चांदीचा नेखला, एक हजार रुपयांचा चांदीचा छल्ला असा सुमारे पावणेचार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.