सांगली : कोरोनामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले असतानाही लाचखोरी मात्र कायम असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात प्रत्येकी २२ जणांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यात महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे तर त्यानंतर पोलिसांचा समावेश आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही लाचखोरी होत आहे.
कोरोनामुळे व्यवहार थांबले असले तरी शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील सर्वसामान्यांची अडवणूक थांबलेली नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झालेल्या तक्रारींनुसार कारवाई करण्यात आली असली तरी लाचखोरी कायम आहे.
लाचलुचपतच्या सांगली विभागाने केलेल्या कारवाईत अनेक बड्या अधिकाऱ्यांनाही रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यात उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यासह नगररचना अधिकाऱ्याचाही समावेश आहे. यासह लाच स्वीकारण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना मदत करणाऱ्या खासगी व्यक्तींवरही कारवाई करण्यात आली आहे. यात केसेस दाखल होऊन पुढील कारवाई सुरू झाली तरीही अनेक विभागात चिरीमिरीसाठी अडवणूक सुरूच असल्याचे चित्र आहे.
चौकट
महसूल, पोलीसच अधिक जाळ्यात
गेल्या तीन वर्षातील लाच स्वीकारताना पकडलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस व महसूल विभागाच्या सर्वाधिक १७ जणांचा समावेश आहे. यासह कामगार कल्याण, अन्न व औषध विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
कोट
शासकीय, निमशासकीय विभागातील कामासाठी कोणत्याही कर्मचाऱ्याने रकमेची मागणी करणे चुकीचे आहे. नागरिकांनीही अशी मागणी होत असल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. पुणे विभागात सर्वाधिक केसेस करण्यात सांगली विभाग नेहमीच प्रभावी ठरला आहे.
- सुजय घाटगे, उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
चौकट
कोणत्या वर्षी किती कारवाया
२०१८ २२
२०१९ २२
२०२० २२
चौकट
महसूल १७
पाेलीस १७
जिल्हा परिषद ४
महापालिका ८
अन्न व औषध प्रशासन २
खासगी इसम ७
आरोग्य १
एस. टी. महामंडळ १