शरद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दारू पिऊन बेदरकारपणे वाहन चालवून स्वत:सह दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कारवाईसाठी असलेल्या ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या केसेस थांबल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहन चालकाने मद्यप्राशन केले आहे की नाही याची पडताळणी करणारे ‘ब्रेथ अॅनालायझर’ मशीनचा वापर थांबल्याने तळीराम मात्र, सुसाट आहेत.
वाहतूक नियमांचे पालन व त्यासाठी वाहतूक शाखा कार्यरत असलीतरी वाहनचालकांनीही नियमांचे पालन करणे आवश्यक बनले आहे. सध्या सुरू असलेल्या वाहतुक सुरक्षा अभियानातून प्रशासनातर्फे याबाबत प्रबोधन केले जात आहे. मात्र, तरीही अनेकजण जिवाची पर्वा न करता वाहन चालवताना दिसत आहेत.
मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईसाठी वाहतूक शाखेकडे ब्रेथ अॅनालायाझर’ मशीनची सोय आहे. यात वाहनचालकांच्या शरीरातील अल्कोहलचे प्रमाण कळत असल्याने पोलिसांना कारवाई करणे सोपे जाते. त्यानंतर शासकीय रुग्णालयात त्याची तपासणी करून पुढील कारवाई होत असते.
ब्रेथ अॅनालायझर मशिनचा वापर वाहनधारकांच्या तोंडात घालून होत असल्याने कोरोना कालावधीत वापर करू नये अशा सूचना होत्या. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शासनाने याबाबत निर्देश दिले होते. त्यामुळे अद्यापही ब्रेथ अॅनालायझरचा वापर बंद आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात येत असलातरी अद्यापही वापराबाबत कोणतेही निर्देश नसल्याने पोलिसांकडून होणाऱ्या ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’च्या केसेस थांबल्या आहेत.
चौकट
तळीरामांची चांदी
पूर्वी पोलिसांकडून होत असलेल्या नाकाबंदीवेळी सर्वाधिक तळीरामांवर कारवाई होत असे. या केसेसची संख्याही अधिक होती. आता मशीनच्या वापरालाच बंदी असल्याने तळीरामांना आवर कोण घालणार? हा सवाल कायम आहे.
कोट
शासनाच्या निर्देशानुसार ब्रेथ अॅनालायझरचा वापर बंद असलातरी मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यावर कारवाई सुरूच आहे. वाहनधारकांनीही वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
प्रज्ञा देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, सांगली