पणुब्रे वारूण येथील विराज शंकर ढेरे हा मुलगा आपल्या घराच्या चौकटीत बसला होता. संध्याकाळची वेळ असल्याने घरातील इतर सदस्यसुद्धा घरातच होते. अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने विराजवर हल्ला केला. कुत्र्याने हाताचा व मांडीचा लचका तोडत मुलास घराबाहेर फरपट नेले. यावेळी त्याचे चुलते हरिभाऊ ढेरे व विश्वास ढेरे यांनी मुलाला वाचविण्यासाठी धाव घेतली असता कुत्र्याने विश्वास ढेरे याच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला; यात विश्वास ढेरे यांच्या गळ्यावर जबर जखम केली आणि तेथून पळ काढला.
ही माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी जखमी दोघांना चरण प्राथमिक केंद्रात उपचारासाठी दाखल केले. या आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नसल्याने प्राथमिक उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. येथे दोघांवर उपचार सुरू आहेत.