सांगली : इतकी वर्षे शरद पवार केंद्रात मंत्री होते, त्यावेळी त्यांनी घटनादुरुस्ती करून आरक्षण का दिले नाही? दोन्ही काँग्रेसमधील मराठा सरदार नेत्यांनाच हे आरक्षण नको आहे, अशी टीका माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत केली.
खोत म्हणाले की, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार पळपुटेपणा करत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेत्यांनाच आरक्षण नको आहे. तरुणांची माथी भडकावून सत्तेच्या पोळ्या भाजण्याचा उद्योग या नेत्यांनी दीर्घकाळ चालवला आहे. घटनादुरुस्ती आवश्यक होती, असे त्यांचे मत असेल तर सत्तेच्या १५ वर्षांत ते का केले नाही? प्रत्येक समाजाला राजकारणासाठी बळी देण्याचे धोरण राबविण्यात आले. आता हेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आरक्षणात विघ्न आणत आहेत. घटनादुरुस्ती करून आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, हा शोध शरद पवार यांना कधी लागला. राज्य मागासवर्गीय आयोगावर नेमलेले सदस्य कोण आहेत आणि त्यांची मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिका काय आहे, हे एकदा जाहीर करावे.
बैलगाडी शर्यतबंदीबाबत खोत म्हणाले की, राज्य सरकार याबाबत काहीच हालचाल करत नाही. शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने ३१ डिसेंबर २०२० रोजी एक पत्र पाठवले, ते मला ऑगस्ट २०२१ ला मिळाले. सरकारचा कारभार किती भोंगळ आहे, याचे उदाहरण आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयात या विषयाच्या खटल्यात चांगले वकील देऊन शर्यतबंदी उठवली पाहिजे. अन्यथा, खिलार जात नष्ट होईल. आम्ही ते बघत बसणार नाही, बैलगाडी मालकांसह रस्त्यावर उतरून लढा उभा करू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.