फोटो ओळ : बोर्गी बुद्रूक (ता.जत) येथील बोर नदीपात्राजवळ हातभट्टी दारू अड्ड्यावर उमदी पोलिसांनी छापा टाकून कच्चे रसायन नष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : बोर्गी बुद्रूक (ता. जत) येथील बोर नदीपात्राजवळ हातभट्टी दारू अड्ड्यावर उमदी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी शिऱ्याप्पा श्रीशैल कांबळे व सुनील भियाप्पा कांबळे (नाईक) हे पोलिसांनी पाहून दुचाकीवरुन पळून गेले. त्यांच्या ताब्यातील २० लीटर दारू, हातभट्टीचा ६०० लीटर कच्चे रसायन असे ३० हजार रुपयांचे साहित्य नष्ट केले. ही कार्यवाही बुधवारी सकाळी सहा वाजता करण्यात आली.
बोर्गी बुद्रूक येथील बोर नदीपात्राजवळ शिऱ्याप्पा श्रीशैल कांबळे व सुनील भियाप्पा कांबळे-नाईक हे हातभट्टी दारू काढून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलीस पथकाने खासगी वाहनाने जाऊन छाप्पा टाकले असताना पोलिसांना पाहून दोघेही पसार झाले. या ठिकाणावरील २० लीटर दारू, ६०० लीटर कच्चे रसायन, ड्रम, इतर साहित्य पोलिसांनी फोडून नष्ट केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक शिरीष शिंदे, हवालदार नितीन पलुसकर, श्रीशैल वळसंग यांनी ही कारवाई केली.