मिरज : मिरज रेल्वे स्थानकात तिकीट खिडकीवर बोगस प्रवाशांच्या नावाने तत्काळ आरक्षित तिकीट काढून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी रिचर्ड ओवियर अँथनी व तिकीट एजंट उमेश उर्फ पप्पू बाळकृष्ण लिगाडे या दोघांवर रेल्वे सुरक्षा दलाने गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
मिरज रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृत तिकीट एजंट बोगस प्रवाशांच्या नावाने तत्काळ आरक्षित तिकीट काढून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली. रविवारी स्थानकात आरक्षित तिकीट काढणाऱ्या रिचर्ड अँथनी याच्याकडे चौकशी केली असता, त्याने पप्पू लिगडे याच्यासाठी तिकीट काढत असल्याचे सांगितल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेऊन रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन दोघांनाही अटक केली. या कारवाईमुळे अनधिकृत तिकीट एजंटांमध्ये खळबळ उडाली आहे.