विटा : भाजपसह अन्य पक्षात गेलेले राष्ट्रवादीचे सहकारी पुन्हा स्वगृही परतत आहेत. आता केवळ सुरुवात झाली आहे. भाजपचे दहा ते बारा जिल्हा परिषद सदस्य सध्या आमच्या संपर्कात असल्याने येत्या काही महिन्यात जिल्ह्यात भाजपचा ‘करेक्ट’ कार्यक्रम होणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी शुक्रवारी केला.
येथे युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभास आले असताना त्यांनी पक्षप्रवेशाबाबतची भूमिका स्पष्ट केली. प्रदेश प्रतिनिधी माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुशांत देवकर उपस्थित होते.
अविनाश पाटील म्हणाले, राष्ट्रवादीला २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यापैकी १७ वर्षे पक्ष सत्तेत आहे. गेल्या पाच-सहा दिवसांतील राष्ट्रीय घडामोडी पाहता पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना राष्ट्रीय पातळीवर मोठी संधी मिळणार असल्याचे संकेत आहेत. आजपर्यंत अनेकांनी पक्षाच्या मदतीने आमदार, खासदार व इतर पदे उपभोगली आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खा. पवार यांची साथ सोडली. परंतु, आता ते सहकारी पक्षात परतत आहेत. सांगली जिल्हा परिषदेचे भाजप सदस्य राष्ट्रवादीत जाहीरपणे प्रवेश करीत आहेत. आणखी १० ते १२ सदस्य आमच्या संपर्कात असून तेही भाजपमधून बाहेर पडून राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यात जिल्ह्यात भाजपचा ‘करेक्ट’ कार्यक्रम होणार आहे.