जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी रद्द झालेल्या विंधन विहिरी, मागासवर्गीय शौचालय अनुदानात गैरव्यवहार तसेच ग्रामसेवक बदली प्रकरणातील अनियमिततेबाबत गटविकास अधिकारी अप्पासाहेब सरगर यांच्यावर केलेल्या आरोपांचे पडसाद उमटले. प्रभारी सभापती अनिल आमटवणे यांनी कोरे यांच्या आरोपांचे पत्रकार बैठकीत खंडण करीत गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचे समर्थन केले. आमटवणे म्हणाले, जिल्हा परिषदेत बहुमत गमावलेल्या अध्यक्षांनी प्रथम राजीनामा द्यावा. मगच अधिकाऱ्यांवर आराेप करावेत.
गटविकास अधिकारी अप्पासाहेब सरगर यांनी रखडलेल्या घरकुल योजनेसह अनेक कामे मार्गी लावली. पंचायत समितीला शिस्त लावली. अध्यक्षा कोरे यांचे आरोप बालिशपणाचे व हास्यास्पद आहेत. मुळात त्यांनी आराेप अभ्यासपूर्वक करणे गरजेचे होते. आरोप केलेले तीनही विषय तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांच्या काळातील आहेत. त्यांची चौकशी होऊन अहवालही जिल्हा परिषदेकडे कारवाईसाठी पाठविण्यात आले आहेत. यातील काही विषय निकालात निघाले आहेत.
अध्यक्षांनी सुचविलेल्या ग्रामसेवक बदलीसारख्या नियमबाह्य कामांना गटविकास अधिकाऱ्यांना दाद दिली नाही. तसेच वड्डी येथील बंधाऱ्याचे काम ग्रामस्थांनी बंद पाडल्याच्या रागातून काेरे यांनी गटविकास अधिकारी सरगर यांची बदनामी सुरू केली आहे. गटविकास अधिकारी चुकले असतील तर आम्ही अध्यक्षांच्या बाजूने राहू, ते चुकले नसतील तर त्यांची, पर्यायाने पंचायत समितीची बदनामी सहन करणार नाही.
चौकट
तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही
आमटवणे म्हणाले, माजी बांधकाम सभापती अरुण राजमाने यांनी पंचायत समितीला एक कोटीचा विकास निधी दिला. मात्र काेरे यांनी एक रुपयाचा निधी न देता सुचविलेल्या कामाकडेही दुर्लक्ष केले. कत्तलखान्याच्या विषयाकडेही लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. त्यामुळे कोरे यांना कोणत्याच विषयावर बोलण्याचा अधिकार नाही.