बहुजन समाजात फूट पाडण्याची खेळी

By admin | Published: January 19, 2017 11:20 PM2017-01-19T23:20:11+5:302017-01-19T23:20:11+5:30

वामन मेश्राम : मोर्चाच्या माध्यमातून राजकीय परिवर्तन घडविणार

Bihari society disintegration | बहुजन समाजात फूट पाडण्याची खेळी

बहुजन समाजात फूट पाडण्याची खेळी

Next



सांगली : बहुजन समाजाच्या मोर्चांना राज्यभर सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. असे असताना ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय देऊन सरकारकडून बहुजनांत फूट पाडली जात आहे. बहुजनांत एकी वाढत असताना, फूट पाडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘व्हिलन’ची भूमिका बजावत असल्याचा आरोप ‘बामसेफ’चे अध्यक्ष वामन मेश्राम यांनी गुरूवारी येथे पत्रकार बैठकीत केला.
मेश्राम म्हणाले की, बहुजन समाजाच्या मागण्यांसाठी राज्यभर मोर्चे सुरू असून, त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. बहुजन समाज आणि संघटना एकत्र येत असल्यानेच मोर्चे यशस्वी होत आहेत. असे असले तरी सरकारकडून मात्र, यात फूट पाडण्याचा डाव सुरू आहे. यापासून लोकांनी सावध राहिले पाहिजे. सांगलीत या मोर्चासाठी बहुजन आणि मुस्लिम समाजात झालेली एकी इतरत्र कोठेही दिसली नाही. चार जिल्ह्यांतून मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. त्यामुळे ताकद मिळाली आहे. मौलाना सज्जाद नोमानी यांच्यामुळेच या गोष्टी शक्य झाल्या आहेत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नगरपालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशावर ते म्हणाले की, भाजपला नेहमीच शहरी पातळीवर यश मिळत आले आहे. मुळात या पक्षाची ओळखच शहरी असल्याने, त्यांना पाठिंबा मिळाला असेल. मात्र, आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत त्यांचा कस लागणार आहे. (प्रतिनिधी)
राजकीय परिवर्तनासाठीच : बहुजन मोर्चा...
भविष्यकालीन राजकीय वाटचालीबाबत मेश्राम म्हणाले की, बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सुरू असलेली ही एक मशागत आहे. सामाजिक, धार्मिक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजकीय परिवर्तनासाठी ही मशागत चालू आहे. बहुजन मोर्चा काढतोय ते
हे ‘मख्खन’ काढण्यासाठीच असून, भविष्यात राजकीय क्षेत्रात अनेकांना धक्के बसणार आहेत.
मराठा मोर्चाचे संयोजक मला येऊन भेटत आहेत. कोणाच्या तरी सांगण्यावरून आम्ही मराठा क्रांती मोर्चे काढले, ही आमची चूक झाली, असे ते सांगत असल्याचे मेश्राम यांनी सांगितले.
दुकाने बंद
आझाद चौक, कॉलेज कॉर्नर, आपटा पोलिस चौकी, सिव्हिल चौक, काँग्रेस भवन, राम मंदिर, पुष्पराज चौक, विश्रामबाग ते पुष्पराज चौक या मार्गावरील दुकाने बंद होती. रिक्षा थांब्यावरही रिक्षा नव्हत्या. पोलिसांनी पार्किंगचे चांगल्याप्रकारे नियोजन केल्याने मोर्चाच्या मार्गावर एकही वाहन घुसले नाही. त्यामुळे कुठेही विस्कळीतपणा जाणविला नाही.
अग्निशमन दलाची धाव
बहुजन क्रांती मोर्चाला सुरूवात होताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी खणाणला. पुष्पराज चौकातील मंगलधाम शॉपिंग सेंटरमधील गाळे पेटल्याची खबर दूरध्वनीवरून देण्यात आली. अग्निशमन दलाचे प्रमुख शिवाजी दुधाळ यांनी तातडीने अग्निशमन दलाच्या वाहनासह घटनास्थळाकडे धाव घेतली. गर्दीतून वाट काढत अग्निशमन दलाची गाडी मंगलधाम शॉपिंग सेंटरजवळ पोहोचली. पाहतो तर तिथे कचराकुंडी पेटविण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने कचरा कुंडीतील आग विझवित सुटकेचा नि:श्वास टाकला.
पाणी, सरबताची सोय
मोर्चात सहभागी झालेल्यांना विविध ठिकाणी सरबत, पाण्याची सोय करण्यात आली होती. राममंदिर चौकात इकलास बारगीर फ्रेंडस् सर्कलच्यावतीने सरबताचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेवर राजमाता जिजाई सेवा प्रतिष्ठान व उर्दू हायस्कूलजवळ मिरजेच्या सौदागर वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने पाणी वाटप करण्यात येत होते. त्याशिवाय पुष्पराज चौकात एक रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहन ठेवण्यात आले होते.
वाहतूक वळविली
मिरजेकडे जाणारी वाहतूक आंबेडकर रस्ता, सिव्हिल चौक, त्रिकोणी बाग मार्गे माळी चित्रमंदिर, चांदणी चौकातून विश्रामबागच्या सेवा रस्त्यावरून वळविण्यात आली होती. विश्रामबाग चौकातून पुष्पराज चौकाकडे येणारे दोन्ही प्रमुख रस्ते बंद केले होते. केवळ सेवा रोड वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला होता.
कडेकोट पोलिस बंदोबस्त
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षक : एक पोलिस उपअधीक्षक : दोन, पोलिस निरीक्षक : १९, सहाय्यक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक : ७२, पोलिस कर्मचारी : सातशे असा बंदोबस्त तैनात होता. सकाळी सातपासूनच पोलिस बंदोबस्ताच्या पॉर्इंटवर हजर झाले होते. वरिष्ठ अधिकारी बंदोबस्त तसेच मोर्चाचा आढावा घेत होते.
काटेकोर नियोजन
बहुजन क्रांती मोर्चात जिल्ह्यातून लोक सहभागी झाले होते. मोर्चाच्या संयोजन समितीने काटेकोर नियोजन केले होते. इंदिरा भुवन-पुष्पराज चौक ते टाटा पेट्रोल पंपापर्यंतच्या रस्त्यावर संयोजकांनी ठिकठिकाणी ध्वनिक्षेपकाची व्यवस्था केली होती. त्यावरून वारंवार सूचना दिल्या जात होत्या. त्यामुळे शिस्तबद्धता दिसत होती.

Web Title: Bihari society disintegration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.