मिरज : मिरज महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या विविध मागण्यांसाठी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघातर्फे (सुटा) आज (शुक्रवारी) मिरजेत गांधी चौकाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलनात सहभागी प्राध्यापकांची छायाचित्रे घेणाऱ्या महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांसोबत आंदोलकांची बाचाबाची झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले. मिरज महाविद्यालयातील अध्यापकांवर गेली काही वर्षे सातत्याने अन्याय सुरू आहे. व्यवस्थापन या शिक्षकांवर दबावतंत्राचा वापर करून पिळवणूक करीत आहे. सेवानियमावलीचे पालन न करता अध्यापकांवर बेकायदेशीर व आकसापोटी कारवाई करीत असल्याची शिक्षक संघाची तक्रार आहे. या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी ‘सुटा’तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. थकित वेतन व रोखलेल्या वेतनवाढी अदा करा, शिक्षकांचे स्थान निश्चितीचे प्रस्ताव त्वरित पाठवा, आकसापोटी सुरू केलेली चौकशी थांबवा, विद्यापीठ व शासन आदेशाचे तातडीने पालन करा, अनुदान रकमेच्या गैरव्यवहाराची चौकशी करा, विद्यापीठ व शासन आदेशाचे पालन न करणाऱ्या प्राचार्यांवर कारवाई करा, विद्यापीठ नियमाप्रमाणे शिक्षक पदे त्वरित भरा, कार्यभाराच्या नियमांचे काटेकोर पालन करा, या प्राध्यापकांच्या मागण्या आहेत. या मागण्यांसाठी ‘सुटा’चे कार्यवाह डॉ. आर. एस. पाटील, यु. ए. वाघमारे, प्रा. भारत जाधव यांच्यासह अध्यापक आंदोलनात सहभागी होते. आंदोलकांची छायाचित्रे घेण्यासाठी मिरज महाविद्यालयाचे काही कर्मचारी आले असता, आंदोलकांनी छायाचित्रे घेण्यास आक्षेप घेतल्याने दोन्ही गटात बाचाबाची झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून छायाचित्रे घेणाऱ्यांना पिटाळले. महाविद्यालयाच्या प्राचार्यांना आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन दिले. (वार्ताहर)
मिरजेत आंदोलनावेळी बाचाबाची
By admin | Updated: March 20, 2015 23:17 IST