खूनप्रकरणी अटकेत असलेल्या सागर सुरेश सावंत यास न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडी दिली; तर अमोल खामकर कोरोनाबाधित असल्याने त्यास मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
मृत दत्तात्रय झांबरे याच्यासोबत आरोपी अमोल ऊर्फ धर्मराज आनंदा खामकर, सागर सुरेश सावंत, वैभवकुमार जाधव व अन्य दोघे असे सहाजण दारूची पार्टी करण्यासाठी पंढरपूर रस्त्यावर वॉटरपार्कच्या मागे असलेल्या बंद कारखान्यात गेले होते. यावेळी सिगारेट आणण्यास उशीर झाल्याने अंगावर कोयता घेऊन धावून आलेल्या दत्तात्रय झांबरे याचा अमोल व सागर या दोघांनी खून केला.
दत्तात्रय झांबरे याच्या खुनानंतर त्याचा मृतदेह नसल्याने शनिवारी पोलिसांनी खुनाचे स्थळ निश्चित केले. संशयित सागर सावंत यास घेऊन पोलीस खून झालेल्या ठिकाणी गेले. त्यावेळी दत्तात्रय हा कोयता घेऊन अंगावर आलेली जागा सागर याने दाखविली. खुनावेळी दत्तात्रय व अमोल या दोघांनीही मद्यपान केले होते. शुद्धीत असलेल्या सागरने त्याच्याकडील कोयता काढून घेऊन गळ्यावर वार केला. अमोल याने दत्ताच्या डोक्यात दगडाने हल्ला केला. त्यानंतर दोघांनी अन्य साथीदारांना तेथून निघून जाण्यास सांगितले. सर्वजण तेथून गेल्यानंतर सागर व अमोल यांनी रात्री १०.३० वाजता तेथून काही अंतरावर दत्तात्रय याचा मृतदेह नेला. त्याच्या अर्ध्या मृतदेहाचे तुकडे केले. तेथे एका पोत्यात त्याच्या अर्ध्या मृतदेहाचे तुकडे व अर्धा मृतदेह एका पोत्यात भरून महामार्गापासून दाेन किलोमीटर आत दंडोबा डोगराच्या पायथ्याशी असलेल्या खामकर वस्तीजवळ एका शेतात दुचाकीवरून नेला.
तेथे रात्री १०.३० ते पहाटे ४ पर्यंत तब्बल सहा तास सागर व अमोल हे दत्तात्रय याच्या मृतदेहाचे बारीक तुकडे करीत होते. हे तुकडे त्यांनी एका शेतात कूपनलिकेत टाकले. मांसाच्या तुकड्यांची पूर्ण विल्हेवाट लावण्यासाठी दोघांनी कूपनलिकेत मीठ टाकून खुनासाठी वापरलेला दगडही त्यातच टाकला. याबाबतची कबुली सागर याने दिली आहे. दत्ताचा खून पचविण्यासाठी कोणतेही पुरावे मागे ठेवायचे नाहीत, या उद्देशाने सागर व अमोल या दोघांनी त्याच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दत्तात्रय याच्या मृतदेहाचे तुकडे कूपनलिकेच्या पाईपमधून बाहेर काढण्यात अद्याप पोलिसांना यश मिळालेले नाही.