मर्दवाडी (ता. वाळवा) येथे श्रीमती सुलोचना सुरेश भोसले यांच्याकडे ‘जयंत घरकूल’ची चावी प्रतीक पाटील यांनी सुपूर्द केली. यावेळी प्रा. शामराव पाटील, झुंझारराव पाटील, जनार्दन पाटील, संग्राम पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : आपल्या चंद्रमौळी झोपडीत राहत, दारिद्र्याशी दोन हात करणाऱ्या मर्दवाडीच्या सुलोचना मावशींच्या हाती युवा नेते प्रतीक पाटील यांनी सुंदर व प्रशस्त अशा ‘जयंत घरकूल’ची चावी देताच त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. साहेबांचे उपकार मी कसे फेडू? अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतीक पाटील व राजवर्धन पाटील यांचे प्रयत्न, तसेच राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी संचलित जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाच्या माध्यमातून त्यांना हे घरकूल मिळाले आहे. याप्रसंगी राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील, पं. स. सदस्य जनार्दन पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, अभियानाचे समन्वयक इलियास पीरजादे उपस्थित होते.
सुलोचना सुरेश भोसले यांच्या पतीचे गेल्या १५ वर्षांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले. कुटुंबास शेती नाही, घरात कोणी कर्ते नाहीत. लहान मुलगा गणेश शिकत होता. त्यांनी मोलमजुरी करीत प्रपंचाचा गाडा पुढे रेटला. त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे घराची मागणी केली. प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील यांनी लक्ष घातले आणि जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाच्या माध्यमातून सुलोचना भोसले यांना प्रशस्त, सुंदर आसरा मिळाला.
यावेळी माजी संचालक दिनकर पाटील, सरपंच प्रल्हाद पाटील, उपसरपंच वैभव पाटील, अशोक पाटील, नारायण पाटील, दत्तात्रय पाटील, अभिजित पाटील, तानाजी पाटील, राजाराम यादव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.