सांगली : लहान करदात्यांवरील अनुपालनाचा भार कमी करण्याच्या उद्देशाने मागील वर्षाची एकूण उलाढाल ५ कोटीपेक्षा कमी असलेल्या नियमित करदात्यांना काही अटींवर तिमाही विवरणपत्र भरण्याची मुभा दिली आहे. जिल्ह्यातील २० हजार करदात्यांना याचा लाभ मिळणार असून, याच्या पर्याय नोंदणीस ऑनलाईन सुरुवात झाली आहे.
तिमाही करदात्यांना, तिमाहीच्या पहिल्या दोन महिन्यांकरिता, मागील तिमाहीच्या एकूण निव्वळ रोख कर देयतेच्या ३५ टक्के कर देण्यासाठी स्वयंनिर्मित चलनाचा पर्याय असेल किंवा दुसरा पर्याय म्हणून करदाते स्वयं निर्धारणेअंतर्गत आपला कर भरू शकतात. तसेच करदाते आपल्या इनव्हायसची माहिती दर महिन्याला अपलोड करू शकतात. जेणेकरून त्यांच्या ग्राहकांना आयटीसी घेणे दर महिन्याला शक्य होईल.
नवीन विवरणपत्र पद्धतीमध्ये तिमाही जीएसटीआर-१ सादर करण्याची मुदत तिमाही संपल्यानंतर येणाऱ्या महिन्याच्या १३ तारखेपर्यंत असेल, तर महाराष्ट्रात तिमाही जीएसटीआर-३ बी सादर करण्याची मुदत तिमाही संपल्यानंतर येणाऱ्या महिन्याच्या २२ तारखेपर्यंत असेल. यामुळे अशा लहान करदात्यांना यापुढे वार्षिक २४ विवरणपत्राऐवजी फक्त ८ विवरणपत्रे भरावी लागतील. अशा करदात्यांना प्रत्येक महिन्यात शेवटच्या क्षणी पोर्टलवर होणारी गर्दी टाळता येईल. वेळेत न विवरणपत्र भरणाऱ्या करदात्यांना भराव्या लागणाऱ्या दंडाच्या रकमेतूनही दिलासा मिळणार आहे. मोठ्या करदात्यांना जीएसटी नेटवर्कवर अधिक वेगाने विवरणपत्र सादर करता येतील. सल्लागारांकडे अंतिम तारखेला येणारा कामाचा भारही मोठ्या प्रमाणत हलका होणार आहे.