जिल्ह्यातील शाळांची घंटा आज वाजणार...

By Admin | Updated: June 15, 2015 00:18 IST2015-06-15T00:12:06+5:302015-06-15T00:18:30+5:30

नव्याची नवलाई : गुलाबपुष्प देऊन होणार स्वागत, शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारात झुंबड

The bells of schools in the district will start today ... | जिल्ह्यातील शाळांची घंटा आज वाजणार...

जिल्ह्यातील शाळांची घंटा आज वाजणार...

सांगली : नवा वर्ग, नवी पुस्तके, नवा गणवेश अशा अनेक नव्या गोष्टींची नवलाई, उत्सुकता आणि उत्साहाचे उधाण मनात घेऊन चिमुकली पावले सोमवारी शाळांमध्ये दाखल होणार आहेत. जवळपास दोन महिन्यांपासून शांत असलेल्या शाळेच्या आवारात पुन्हा सोमवारपासून किलबिलाट सुरू होणार आहे.
गेल्या दोन महिन्यांच्या खंडानंतर सोमवारी शाळा सुरु होत आहेत. बालवाडी ते माध्यमिक शाळांचा यामध्ये समावेश असून, मंगळवारपासून महाविद्यालये सुरु होणार आहेत. शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला रविवारी गणवेश व शालेय साहित्याच्या खरेदीसाठी पालक, विद्यार्थ्यांची सांगलीच्या बाजारात झुंबड उडाली होती. दरम्यान, वह्यांच्या किमती यावर्षी दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्व बालवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळा सोमवारपासून सुरु करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानुसार शाळांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून साफसफाई सुरु होती. शाळांच्या फलकावर शनिवारीच शाळांचे वेळापत्रक लावण्यात आले होते. काही शाळांनी विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्याचा निर्णय घेतला आहे, तर काहींनी सामूहिकरित्याच विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे ठरविले आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी मधुकर यादव यांच्यासह काही अधिकारी काही शाळांना भेटीही देणार आहेत.
सोमवारी शाळा सुरु होणार असल्यामुळे बाजारात शालेय साहित्य खरेदीसाठी पालक, विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. हरभट रोड, सराफ कट्टा, कापड पेठ, बालाजी चौक, दत्त-मारुती रस्ता, मित्र मंडळ चौकातील रस्ते गेल्या दोन दिवसांपासून गर्दीने फुलून गेले आहेत. वह्या, पुस्तके, स्कूल बॅग, पेन, गणवेश खरेदीसाठी गर्दी झाली होती. कपड्यांच्या दुकानांबरोबरच मित्रमंडळ चौकातील हातगाड्यांवरही शालेय गणवेशासह इतर कपडे खरेदीसाठीही गर्दी होती. काही शाळांनी गणवेशासाठी काही दुकानांची नावे पालकांना सुचवली आहेत. त्यामुळे दुकानदारांनी संबंधित शाळांचा गणवेश आमच्याकडे मिळेल, असा फलक लावला आहे.
वह्यांच्या किमतीत दहा टक्के वाढ
इतर शालेय साहित्याचे दर यंदा स्थिर असले तरी, वह्यांच्या किमती मात्र दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. अर्थात काही कंपन्यांनी यावर दहा टक्के सूटही जाहीर केल्याची माहिती साहित्य विक्रेते विजय तानवडे यांनी दिली. दोनशे पानी लहान वह्या २०० ते ३०० रुपये डझन आहेत, तर ए फोर साईजच्या वह्या ४०० ते ५०० रुपये डझन आहेत. अनेक कंपन्यांनी यावेळी आकर्षक रंगांच्या वह्या बाजारात आणल्या आहेत.

 

Web Title: The bells of schools in the district will start today ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.