सहकार पॅनलविरोधात तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी संस्थापक पॅनल आणि रयत पॅनल प्रयत्नशील आहेत. यामध्ये बोरगाव-रेठरे हरणाक्ष गटात संस्थापक पॅनलकडून केदार शिंदे, उदय शिंदे, तर नेर्ले गटातून विद्यमान संचालक सुभाष पाटील, रयत पॅनलकडून इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, तर नेर्लेतून प्रशांत पाटील यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली आहे. नेर्ले गटातून राजारामबापू बँकेचे उपाध्यक्ष जनार्दनकाका पाटील यांचे जावई आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांचे मेहुणे संभाजी पाटील यांना सहकार पॅनल नेर्ले गटातून पहिल्यांदाच उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. याच गटातून विद्यमान संचालक लिंबाजी पाटील यांचेही नाव निश्चित होण्याचे संकेत आहेत. आता केवळ महाडिक गटाकडून सहकार पॅनलचे विद्यमान संचालक गिरीश पाटील यांचे नाव निश्चित होणार आहे. सहकार पॅनलने एखादा बदल करुन विद्यमान संचालकांनाच उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे वाळवा तालुक्याचा वरचष्मा राहणार आहे.
सहकार पॅनलच्या उमेदवारांविरोधात तोडीस तोड म्हणून संस्थापक पॅनलचे प्रमुख अविनाश मोहिते आणि रयत पॅनलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते यांनीही उमेदवार निश्चित केले आहेत. या दोन्ही गटांतील उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले आहेत. या दोन्ही पॅनलमध्येही जयंत पाटील यांच्याच समर्थकांचा भरणा आहे. या दोन्ही पॅनलचे मनोमिलन झाल्यास यातून वाळवा तालुक्यात एकास एक लढत होण्यासाठी डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांचे प्रयत्न सुरु आहेत. या निवडणुकीत कोणत्याही पॅनलची सत्ता आली तरी वाळवा तालुक्यातून आठ संचालक जाणार आहेत. त्यामुळे कारखान्याच्या राजकारणात एकतृतीयांश संचालक वाळवा तालुक्यातील दिसतील. तिन्ही पॅनलमधील वाळवा तालुक्यातील उमेदवार जवळजवळ निश्चित झाले असून, आता केवळ प्रचाराचा बार उडवणे बाकी आहे!
अशोक पाटील, इस्लामपूर