फोटो-
सोनवडे (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये अशा पद्धतीने सुशोभीकरण करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणावती : सोनवडे (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेत भौतिक सुधारणेबरोबरच शाळा आकर्षक बनविण्यावर भर दिला जात आहे. शिक्षक व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून ही शाळा डिजिटल झाली आहे.
शिराळा तालुक्यातील चांदोली परिसर हा दुर्गम व डोंगरी भाग आहे. त्यामुळे येथे अनेक सोयी-सुविधांचा अभाव दिसून येतो. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतील लाॅकडाऊन काळातही गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर, विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख, आलिशा मुलाणी, विष्णू दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सोनवडे शाळेत सुधारणा करण्यात आल्या आहेत.
शाळेच्या रंगीबेरंगी भिंतीवर पशू-पक्षी, तसेच वृक्ष, मासे, फुलपाखरे व मुलांना आवडणाऱ्या कार्टुन्सची चित्रे साकारल्याने या भिंती जणू बोलक्याच वाटू लागल्या आहेत. केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका विद्या पाटील, अस्मिता घोलपे यांनी शाळाव्यवस्थापन कमिटी, ग्रामपंचायत पदाधिकारी व पालकांच्या सहकार्याने शाळेचा कायापालट केला आहे.